शहापूर गणेशोत्सव महामंडळाच्या बैठकीत निर्णय : पदाधिकाऱयांनी मांडल्या समस्या
प्रतिनिधी /बेळगाव
गणेशोत्सव अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपला असताना प्रशासनाने पीओपी गणेशमूर्ती बंदीचा आदेश दिला आहे. घरगुतीसह सार्वजनिक गणेश मूर्तींवर मूर्तिकार अखेरचा हात फिरवत असताना प्रशासनाला उशिरा सुचलेले शहानपण आहे. प्रशासनाने पीओपी बंदीचा आदेश मागे घ्यावा, असा निर्णय शहापूर मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
रविवारी नाथ पै चौक येथील साईगणेश सोसायटीच्या सभागृहात महामंडळाची बैठक पार पडली. यावेळी विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱयांनी आपल्या समस्या मांडल्या. जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सव संदर्भात घेतलेल्या बैठकीत शहापूर महामंडळाला डावलल्याबद्दल महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. बेळगावमध्ये कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन होते. त्यामुळे नैसर्गिक जलस्त्राsताचे प्रदूषण होत नाही. याचा विचार करून प्रशासनाने पीओपी बंदीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली.
मागीलवषी डॉल्बी लावलेल्या अथवा कोणतीही वादावादी झाल्यास पोलिसांकडून कार्यकर्त्यांवर कारवाई केली जात होती. परंतु असे न करता महामंडळाच्या पदाधिकाऱयांना मध्यस्थी घेऊनच पोलिसांनी कार्यकर्त्यांवर कारवाई करावी, मागील दोन वर्षांत कोरोनामुळे मंडळाची स्थिती खालावली असल्याने हेस्कॉमने डिपॉझिट भरून घेऊ नये, अशी मागणी रणजित हावळाण्णाचे यांनी केली. दीपक गौंडाडकर यांनी सर्व मंडळांना आवाहन करत फटाक्मयांवर अतिरिक्त पैसा खर्च न करता तो गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा, अशी सूचना मांडली. राजकुमार बोकडे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करत कोणत्याही कृतीतून उत्सवाला गालबोट लागेल, असे कृत्य करू नये, असे सांगितले. अशोक चिंडक यांनी उपस्थितांचे स्वागत तर माजी नगरसेवक रमेश सोनटक्की यांनी आभार मानले.
यावेळी नगरसेवक नितीन जाधव, रवी साळुंके, रावबहाद्दूर कदम, प्रभाकर भाकोजी, शिवाजी हावळाण्णाचे, पी. जे. घाडी, शशिकांत सडेकर, गजानन झवर, सुभाष शिंदे, सुधीर कालकुंद्रीकर, हिरालाल चव्हाण, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यासह विविध मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उद्या घेणार जिल्हाधिकाऱयांची भेट
शहापूर मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या अंतर्गत 100 हून अधिक मंडळे आहेत. त्यामुळे या मंडळांना येणाऱया समस्या जिल्हाधिकाऱयांपर्यंत पोहोचविण्यासाठी मंगळवार दि. 2 रोजी जिल्हाधिकाऱयांची भेट घेतली जाणार आहे. यावेळी सर्व मंडळांच्या पदाधिकाऱयांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









