सोमवारपासून आंदोलनाचा इशारा : लॉरी ओनर्स संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : अवजड वाहनांसाठी राज्य सरकारकडून नव्या नियमानुसार लाईफ टाईम टॅक्स आकारणी करण्यात येत आहे. सध्या धावणाऱ्या वाहनांना हाच नियम लागू करण्यात येत आहे. यामुळे वाहनधारकांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. सरकारने हा नियम त्वरित मागे घ्यावा, अन्यथा सोमवारपासून वाहतूक बंद ठेऊन आंदोलन करण्याचा इशारा बेळगाव शहर लॉरी ओनर्स आणि एजंट असोसिएशनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. लघू वाणिज्य वाहनांना (एलसीव्ही) राज्य सरकारकडून टॅक्स आकारणीसाठी नवीन कायदा ऑगस्टपासून अमलात आणला आहे. लाईफ टाईम टॅक्स आकारणी करण्यात येत आहे. नवीन वाहनांसह सध्या रस्त्यावर धावणाऱ्या वाहनधारकांकडूनही याच नियमानुसार टॅक्स आकारणी केली जात आहे. ही टॅक्स आकारणी वाहनधारकांसाठी जाचक ठरत आहे. व्यवसाय नसल्याने वाहनधारकांना मंदीमध्ये दिवस काढावे लागत आहेत. आर्थिक नुकसानीत असणाऱ्या वाहनधारकांना सरकारने लागू केलेली अट अडचणीची ठरत आहे. नव्या वाहनांसाठी हा नियम योग्य असला तरी सध्या रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांना हा नियम लागू करू नये, अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.
पूर्वीपासून तीन महिन्यांला एकदा टॅक्स भरण्यात येत आहे. हा नियम वाहनधारकांसाठी योग्य आहे. मात्र लाईफ टाईम टॅक्स एकदाच भरावा लागत असल्याने इतका पैसा आणणार कोठून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. व्यवसायाअभावी वाहनधारकांना नुकसानीला सामोरे जावे लागत असताना सरकारचा लाईफ टाईम टॅक्सचा नियम कर्जाच्या खाईत लोटणार आहे. सरकारने याचा विचार करून लाईफ टाईम टॅक्स आकारणी नियम त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी होत आहे. सध्या रस्त्यावर धावणाऱ्या एलसीव्ही वाहनांचा पंधरा वर्षांचा कालावधी पूर्ण होत असला तरी त्यांनाही लाईफ टाईम टॅक्स आकारणी केली जात आहे. तसेच कालावधी पूर्ण न झालेल्या वाहनांनाही त्याप्रमाणेच टॅक्स आकारणी केली जात आहे. केंद्र सरकारने 15 वर्षे पूर्ण झालेल्या वाहनांना स्क्रॅपमध्ये काढण्याचा आदेश दिल्यास वाहनधारकांचे नुकसान होणार आहे. राज्य सरकारने याचा विचार करून टॅक्स आकारणी मागे घ्यावी, अन्यथा सोमवारपासून आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय गोटाडकी, गुरुदेव पाटील, हेमंत लेंगडे, गंगाराम सावंत, सतीश आनंदाचे, शिवराज देसाई, राजू पाटील, अभिषेक तुक्कार, सुजय गोटाडकी, कृष्णा गडकरी आदी उपस्थित होते.









