खानापूर येथील नागरिकांची मागणी : अन्यथा आंदोलनाचा इशारा
खानापूर : कर्नाटक सरकारने वाढलेले वीजदर तातडीने कमी करावेत आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशा मागणीचे निवेदन खानापूर शहरातील नागरिकांच्यावतीने उपतहसीलदार एस. एम. संगोळी यांना देण्यात आले. जर येत्या काही दिवसात वाढीव वीजदर कमी केले नसल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. कर्नाटक राज्यात सत्तेत आलेले काँग्रेस सरकार नागरिकांची दिशाभूल करत असून 200 युनिट वीज मोफत देण्याचा बहाणा करून वीजदरात मोठी वाढ करून सामान्य जनतेचे जीवन जगणे कठीण करून सोडले आहे, असे वक्तव्य पंडित ओगले यांनी उपतहसीलदाराना निवेदन देतेवेळी व्यक्त केले. यावेळी मल्लाप्पा मारीहाळ यांनीही कर्नाटक सरकारचा निषेध करत वाढीव वीजदर सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. सरकारने भरमसाठ वीजदर वाढवून जनतेची लूट केली आहे. यासाठी येत्या पंधरा दिवसात ही वाढीव वीजदर मागे घ्यावी आणि जाहीरनाम्यात जाहीर केल्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबाला 200 युनिट वीज मोफत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी शहरातील युवक, महिला तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जर सरकारने येत्या पंधरा दिवसात वाढीव वीजदर मागे घेतली नसल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा पंडित ओगले यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री सिद्धरामय्या, वीजमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.









