कोळी-बेस्त समाजाची मागणी, गृहमंत्र्यांना निवेदन
बेळगाव : मच्छीमार समाजाचे नेते माजी मंत्री प्रमोद मध्वराज यांच्यावर दाखल करण्यात आलेला सुमोटो त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी जिल्हा कोळी-बेस्त समाज संघाने केली आहे. सदस्यांनी शुक्रवार दि. 28 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन गृहमंत्री डॉ. जी. परेमश्वर यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. उडपी जिल्ह्याच्या मल्वे येथे शनिवार दि. 22 रोजी झालेल्या आंदोलनावेळी प्रमोद मध्वराज यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवून पोलिसांनी मध्वराज यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मध्वराज हे कोळी समाजाचे नेते असून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. मच्छीमारांना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न केलेल्यांवर गुन्हा दाखल करण्याऐवजी पोलिसांनी मध्वराज यांच्यावर गुन्हा दाखल केला असून ही कायद्याची पायमल्ली आहे. मच्छीमार समाजाला हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी समाजाने सतर्क राहिले पाहिजे. मध्वराज यांच्यावरील गुन्हा उडपी पोलिसांनी त्वरित मागे घ्यावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.









