वृत्तसंस्था/ नवीदिल्ली
युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच युपीआयवरुनदेखील आता रोकड काढता येणार आहे. मुंबईत सुरु असलेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये यूपीआय एटीएमच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध केली गेली आहे. हे एटीएम वापरण्यासाठी कार्डची गरज भासणार नाही. तर फक्त क्यूआर कोड स्कॅन करुन पैसे काढता येणार आहेत. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी यासंबंधीचा एक व्हीडीओ शेअर केला आहे.
सदरचे एटीएम नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केले आहे. युपीआय एटीएम नेहमीच्या एटीएमप्रमाणे काम करणार आहे. नवीन युपीआय एटीएम सध्या फक्त बीएचआयएम युपीआय अॅपला सपोर्ट करते, परंतु लवकरच गुगल प्ले, फोनपे आणि पेटीएमसारख्या अन्य अॅप्सवर ते वापरता येणार आहे. हे तंत्रज्ञान वेगवेगळ्या टप्प्यात सादर केले जाणार असल्याची माहिती आहे.
एटीएमला ‘मनी स्पॉट युपीआय एटीएम’ असे नाव
जपानी कंपनी हिताचीनेही असे एटीएम बनवले आहे. या एटीएमला ‘मनी स्पॉट युपीआय एटीएम’ असे नाव देण्यात आले आहे. त्यांची देशभरात 3000 हून अधिक एटीएम आहेत.
कसे काम करणार यंत्रणा ?
-एटीएम मशीनवर युपीआय कार्डलेस कॅश निवडा
-100,500,1000,2000,5000 सारखी रक्कम निवडावी
-एटीएमवर क्यूआर कोड दिसणार, अॅपसह स्कॅन करावे
-युपीआय पिन टाकावा, आता रोख रक्कम बाहेर येईल









