बेळगाव बार असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : रामनगर येथे 40 वकिलांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही चुकीची प्रक्रिया असून बेळगाव बार असोसिएशनकडून या घटनेचा निषेध करत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली. रामनगर येथे न्यायालयाच्या आवारात घुसून काही जणांकडून वकिलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करून धमकावले आहे. याची बार असोसिएशनकडून गंभीर दखल घेतली असून रामनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या वकिलांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आवारामध्ये 50 पेक्षा अधिक नागरिक बळजबरीने वकिलांशी हुज्जत घालून धमकावण्यात आले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर वकिलांकडून रामनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षकांनी उलट 40 वकिलांवरच गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हे मागे घेण्यात यावे व पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात यावे. या घटनेची गांभीर्याने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. रामनगर जिल्हा पोलीसप्रमुखांवर कडक कारवाई करावी अशी मागणीही केली आहे. प्रशासनाने याची तातडीने दखल न घेतल्यास भविष्यात वकिलांकडून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी वकील संघटनेचे उपाध्यक्ष विजय पाटील, जनरल सेक्रेटरी वाय. के. दिवटे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.









