मये येथील पंचायतींच्या संयुक्त बैठकीत निर्णय : मये, पिळगाव, मुळगाव व शिरगाव पंचायतींचा समावेश
डिचोली : डिचोलीतील सेसा खाण कामगारांवर आलेल्या संकटाच्या समयी खाण भागातील सर्व चारही पंचायतींनी खाण कामगारांना सहानुभूती दाखवली आहे. या सर्व पंचायतींच्या सरपंचांनी या कामगारांना पाठिंबा देताना या कामगारांना कामाची सुरक्षा मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा ना हरकत दाखला देणार नाही, असे जाहीर केले. पैरा मये डिचोली येथील श्री सिद्धीविनायक मंदिराच्या मंडपात झालेल्या या संयुक्त बैठकीस जि. पं. सदस्य प्रदीप रेवोडकर, मये वायंगिणी सरपंच सुवर्णा चोडणकर, शिरगावच्या सरपंच करिश्मा गावकर, पिळगाव सरपंच मोहिनी जल्मी व मुळगाव सरपंच तृप्ती गाड, सेसा खाण कामगार संघटनेचे अध्यक्ष नीलेश कारबोटकर, कायदा सल्लागार अॅड. अजय प्रभुगावकर यांची तसेच कामगार संघटनेच्या इतर पदाधिकारी, कामगार, वरील चारही पंचायतींचे उपसरपंच, पंचसदस्य यांचीही उपस्थिती होती.
कायदा सल्लागार अॅड. अजय प्रभुगावकर यांनी सर्वांना हा विषय सविस्तरपणे कथन केला. सेसा खाण कंपनीला स्थानिक व या कंपनीत पूर्वीपासून असलेल्या कामगारांनाच घ्यावे लागणार आहे. या कामगारांनी आपल्या जमिनी, शेती, बागायतींचे या खाणींसाठी बलिदान दिले आहे. आज ही कंपनी हुकूमशाही करून या कामगारांना बेकायदेशीररीत्या बाहेर काढायला पाहत आहे. सरकारनेही या कामगारांना लीज कोणालाही गेली तरी कामाची सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे या कामगारांसाठी सर्व पंचायतींच्या सरपंच, उपसरपंच, पंचसदस्यांनी ठाम रहावे, असे आवाहन केले. या वेदांत कंपनीने या डिचोली खाण ब्लॉकचे लीज घेतले आहे. खाण प्रक्रिया सुरू करण्यासाठी त्यांना स्थानिक पातळीवर प्रत्येक पंचायती व नगरपालिकेकडून विविध ना हरकत दाखले लागणार आहेत, ते त्यांना बिनशर्त न देता सर्वप्रथम कामगारांच्या विषयावर तोडगा काढत त्यांना कामावर घ्यावे, कामाची सुरक्षा द्यावी, अशी अट कंपनीला घालावी. तसेच पर्यावरणीय दाखल्यापूर्वी सार्वजनिक सुनावणीही होणार आहे. या सार्वजनिक सुनावणीत गरज पडल्यास तीव्र विरोधही करण्यास सर्वांनी सज्ज रहावे, असे आवाहन करण्यात आले. यावर सर्व पंचायतींच्या सरपंचांनी आपल्या पंचायतींचा कामगारांना पाठिंबा असून त्यांच्या कामाचा विषय सुटत होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची ना हरकत कंपनीला दिली जाणार नाही, असे निर्णय घेतला.









