अध्याय अठ्ठाविसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, मुक्त किंवा आत्मज्ञानी पुरुष संसारात घडणाऱ्या गोष्टी अलिप्तपणाने पहात असतो. इंद्रियांच्या पलीकडे असूनही तो सर्व हालचाली आपण करत आहोत असे भासवत असतो. त्यामुळे तो त्रिगुणांनी युक्त आहे असे वाटते पण प्रत्यक्षात तो निर्गुण असतो. त्याला अजरामर अविनाशी अशा परब्रह्माची प्राप्ती झालेली असल्याने समोर दिसणारे सर्व विश्व हे भासमान असून पूर्णपणे खोटे आहे ह्याची शंभर टक्के खात्री पटलेली असते. सर्व वस्तू मायिक असून त्यांची निर्मिती त्रिगुणांपासून झालेली आहे. मुक्त पुरुषाला त्या त्रिगुणांचा स्पर्शही होत नसल्याने, त्यापासून निर्माण होणाऱ्या विषयांचा उपभोग घेण्याचे त्याच्या मनातही येत नाही. त्यामुळे तो विषयांपासून अलिप्त असतो. जगातील व्यवहार पार पडण्यासाठी तो जगात रमलाय असं केवळ दाखवत असतो. भोगांचे वर्म त्याला कळलेले असल्याने तो देही असून विदेही असतो. या नित्यामुक्ताचे महत्त्व किती म्हणून सांगू, अरे इथवर यायला त्यांना अपार कष्ट पडतात. विशेष करून विषयोपभोगांची अनिवार इच्छा ठायीठायी त्यांची परीक्षा पहात असते. मी म्हणजे हा देह ही जन्मोजन्मीची मनात घट्ट रुतून बसलेली कल्पना सहजासहजी साधकाच्या मनातून जायला तयार होत नसते. त्यामुळेच क्षणोक्षणी विषयांचे उपभोग साधकाला खुणावत असतात आणि साधकाने आपला उपभोग घ्यावा म्हणून आवाहन करत असतात. त्यातच साधकाचा स्वाभिमान त्याला भरीला घालून सुचवत असतो की, जीवनात जे काही मिळवायचे होते ते मिळवून झाले आहे तेव्हा आता विषयांचा उपभोग घ्यायला काहीच हरकत नाही. इथेच साधक गडबडतो आणि भ्रमित होतो कोणत्याही क्षेत्रात एकवेळ यश मिळवणे सोपे पण टिकवून ठेवणे महाकर्मकठीण असते. परमार्थात तर असा अनुभव हटकून येतो म्हणून साधकाने निरिच्छ असावे. प्रारब्धानुसार वाट्याला येणारे भोग अलिप्तपणे भोगावेत म्हणजे विषयांची ओढ वाटत नाही. विषयोपभोग घ्यायला एकदा सुरुवात झाली की, ते आणखीन आणखीन भोगायला मिळावेत अशी अपेक्षा वाढू लागते. मी तुला आत्तापर्यंत वारंवार निरपेक्षतेचे महत्त्व सांगत आलो आहे ते ह्यासाठीच, एक निरपेक्षता हाती आली की, सर्व परमार्थ साधला म्हणून समज एव्हढे ह्या निरपेक्षतेचे महत्त्व आहे. भल्याभल्या ज्ञानी लोकांना विषयांची अपेक्षा अगदी गलितगात्र करून सोडते, त्यांची आजवरची तपश्चर्या धुळीस मिळवते आणि पुन्हा त्यांना सामान्य माणसांच्या रांगेत उभी करते. कसे ते सविस्तर सांगतो ऐक. जे ज्ञानी लोक स्वत:ला ज्ञानी समजून इतरांना अज्ञानी समजतात त्यांना देहाभिमान होत असतो. त्यातूनच विषयांची गोडी लागून निश्चितच बद्धता येते. म्हणून बद्धतेचे निवारण करण्यासाठी विषयलोलुपता सोडून द्यावी. कारण विषयत्याग केल्याशिवाय नित्यमुक्तता घडत नाही. लोक निरनिराळ्या प्रकारचे ज्ञान जरूर मिळवतात पण त्यानाही स्वत:च्या विषयोपभोगाच्या लालसेवर नियंत्रण ठेवता येत नाही. किती म्हणून उदाहरणे सांगू. चारही वेद शिकून एखादा वेदशास्त्रसंपन्न होऊनही त्याला विषयभोगाबाबत गोडी असेल तर ती अत्यंत बाधक ठरते. वेदशास्त्रसंपन्न ज्याप्रमाणे विषयांच्या ओढीने दारूण दु:ख भोगतो अगदी तसेच एखाद्याने अगदी तळहातावर ठेवलेला आवळा जसा चहुबाजूनी निरखून पाहून त्याची माहिती घेता येते त्याप्रमाणे शास्त्रज्ञान जाणून घेतलेले असले तरी त्याला विषयभोग जर प्रिय असतील तर त्यालाही दारूण दु:ख भोगावे लागते. एखाद्याने भरपूर काळ तपश्चर्या करून प्राण आणि अपानावर प्रभुत्व मिळवून त्यांना समान अवस्थेत आणून ठेवले असले म्हणजे प्राणायामात त्याने अगदी नैपुण्य मिळवलेले असले तरी विषयभोगांची लालसा त्याचाही घात करते. त्यामुळे त्यालाही दारूण दु:ख भोगावे लागते. थोड्क्यात साधक वेदशास्त्रसंपन्न असुदेत किंवा योगशास्त्रसंपन्न असुदेत विषयभोगाची आवड त्याचा घात केल्याशिवाय रहात नाही. म्हणून साधकाने सदैव सावध रहावे.
क्रमश:








