अॅडम मिल्ने : 34 धावांत 4 बळी
वृत्तसंस्था/ ढाका
न्यूझीलंडने ढाका येथे झालेल्या अंतिम एकदिवसीय सामन्यात बांगलादेशचा 2-0 असा व्हाईटवॉश करून विश्वचषक स्पर्धेपूर्वी स्वत:ला चांगली चालना दिली. विल यंग आणि अॅडम मिल्ने यांनी अनुक्रमे फलंदाजीत व गोलंदाजीत योगदान देत हा विजय नोंदविण्यास मदत केली. यंगने 80 चेंडूंत 70 धावा काढून न्यूझीलंडला 3 बाद 175 पर्यंत नेले. त्यापूर्वी ढाक्याच्या शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर मिल्नेच्या 34 धावांतील 4 बळींनी यजमानांना 34.3 षटकांत 171 धावांवर रोखले.

हंगामी कर्णधार नजमूल हुसेन शांतोने बांगलादेशसाठी सर्वाधिक 76 धावा केल्या, परंतु त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर दुसऱ्या बाजूने पाठिंबा नसल्यामुळे तो यजमानांना विजय मिळवून देऊ शकला नाही. त्यानंतर यंगने फॉर्मात असलेल्या हेन्री निकोल्ससोबत तिसऱ्या गड्यासाठी 81 धावांची भागीदारी केली. त्यामुळे न्यूझीलंडने फिन अॅलन (28) आणि डीन फॉक्सक्रॉफ्ट (0) यांना शरीफुल इस्लामच्या सलग चेंडूंवर गमावूनही आपले लक्ष्य पूर्ण केले.
डावखुरा फिरकीपटू नसुम अहमदने यंगला त्रिफळाचित केले तोपर्यंत सामना न्यूझीलंडच्या ताब्यात गेला होता. निकोल्सने वेळीच महमुदुल्लाह रियादच्या चेंडूवर एक धाव काढून आपले अर्धशतक पूर्ण केले. टॉम ब्लंडेलने (नाबाद 23) चौकार हाणून न्यूझीलंडला 91 चेंडू शिल्लक असताना विजय मिळवून दिला. त्यापूर्वी कोल मॅककॉन्ची आणि ट्रेंट बोल्ट यांनी मालिकेतील आपला पहिला सामना खेळत असलेल्या मिल्नेला पूरक ठरताना अनुक्रमे 18 धावांत 2 आणि 33 धावांत 2 बळी मिळविले आणि बांगलादेशला सावरू दिले नाही. 2010 मध्ये बांगलादेशमध्ये 4-0 आणि 2013 मध्ये 3-0 अशा फरकाने मालिका गमवाव्या लागलेल्या किवींनी शनिवारी दुसरा सामना 86 धावांनी जिंकला होता, तर पहिला सामना पावसात वाहून गेला होता.









