वृत्तसंस्था/ हिसार
येथे सुरू झालेल्या पुरुषांच्या राष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत विश्व चॅम्पियनशिप मुष्टीयुद्ध स्पर्धेतील कास्यपदक विजेता मनीष कौशिक तसेच रेल्वेचे रोहित टोकास आणि सचिन यांनी आपल्या वजन गटातून विजयी सलामी दिली.
पुरुषांच्या 63.5 किलो वजन गटात मनीष कौशिकने मध्यप्रदेशच्या प्रभात दिवेदीचा तिसऱया फेरीतच पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले. आता मनीष कौशिकचा पुढील फेरीतील सामना आंध्रप्रदेशच्या संदीप धोनीशी मंगळवारी होणार आहे. पुरुषांच्या 67 किलो वजन गटातील पहिल्या फेरीच्या लढतीत बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कास्यपदक विजेता रेल्वेच्या रोहित टोकासने उत्तराखंडच्या राहुलचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले. 57 किलो वजन गटात रेल्वेच्या सचिनने दमन-दीवच्या रमन शर्मावर 5-0 अशी मात केली. 2016 च्या युवा विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेत सचिनने विश्वविजेतेपद मिळवले होते. सचिनचा पुढील फेरीतील सामना हरियाणाच्या नीरजबरोबर होणार आहे. 48 किलो वजन गटात गोविंदला गुजरातच्या जेनीष पटेलकडून पुढे चाल मिळाली आहे. 54 किलो वजन गटात प्रियांदू दबासने छत्तीसगडच्या प्रकाश सिंगवर मात करत पुढील फेरीत प्रवेश मिळवला आहे. भारताचा अव्वल मुष्टीयोद्धा शिवा थापाला या स्पर्धेतील पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. या स्पर्धेमध्ये विविध राज्यांचे सुमारे 386 स्पर्धेक सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा 13 विविध वजन गटात घेतली जात आहे.









