वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत व इंग्लंड यांच्यातील क्रिकेटच्या मैदानातील शत्रुत्वाचा एक भाग म्हणून पतौडी हे नाव कायम राहील आणि आगामी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील विजेत्या कर्णधाराला दोन्ही देशांमधील खेळाशी समृद्ध संबंध असलेल्या सदर राजघराण्याच्या नावाचे पदक देण्यात येईल.
पतौडी ट्रॉफीचे नाव बदलून तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी करण्याचा निर्णय इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने घेतला आहे. गेल्या आठवड्यात लॉर्ड्स येथे झालेल्या डब्ल्यूटीसी फायनलच्या वेळी त्याची औपचारिक घोषणा होणार होती. परंतु अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण एअर इंडिया विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर ती पुढे ढकलण्यात आली. ट्रॉफीचे नाव बदलण्याच्या निर्णयावर भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांच्यासह इतर काहींनी टीका केली आहे. तथापि मिळालेल्या माहितीनुसार, तेंडुलकरने स्वत: ईसीबीशी संपर्क साधून पतौडी हे नाव भारत-इंग्लंड क्रिकेटचा भाग राहिले पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांचीही यात भूमिका राहिलेली आहे.
हे घडले तेव्हा सचिनने ईसीबीशी संपर्क साधला आणि भारत-इंग्लंड स्पर्धेचा भाग म्हणून पतौडीचे नाव राहिले पाहिजे असे सांगितले. जय शाह हेही चर्चेत सहभागी होते. ईसीबीने विनंती मान्य केली असून त्यानुसार विजेत्या कर्णधाराला पतौडी पदक देण्याचा निर्णय घेतला आहे, असे बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले. ब्रिटनमध्ये नियोजित समारंभ आयोजित करण्याच्या दृष्टीने बाबी पुढे सरकल्या नसल्याने आता चषकाचे नाव बदलण्याची औपचारिक घोषणा लीड्स येथे होणाऱ्या मालिकेच्या सुऊवातीच्या सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजे 19 जून रोजी होणार आहे.
तेंडुलकर हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे, तर अँडरसनने या पारंपरिक स्वरूपात वेगवान गोलंदाज म्हणून सर्वाधिक बळी घेतले आहेत. दुसरीकडे, पतौडींचे भारत-इंग्लंड क्रिकेटशी दृढ संबंध राहिलेले आहेत. इफ्तिकार अली खान पतौडी आणि त्यांचे पुत्र मन्सूर या दोघांनीही भारताचे नेतृत्व केले आणि दोघेही इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळले.









