मालवण ।प्रतिनिधी
सकस, समतोल तसेच विषमुक्त आहार हा निरोगी जीवनासाठी अत्यावश्यक आहे. रानभाज्यांमध्ये निसर्गतःच मुबलक प्रमाणात जीवनसत्वे व खनिजे असतात. यांचा दैनंदिन अन्नातील वापर वाढवायला हवा. त्यामुळे समतोल आहाराची कमतरता भरून येण्यास मदत होईल. रानभाजी महोत्सवामध्ये सादर झालेल्या विविध रानभाज्यांपासून बनलेल्या पाककृती मुळे यास निश्चितपणे चालना मिळेल तसेच रानभाजी विषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल असे प्रतिपादन उपविभागीय कृषी अधिकारी कणकवली श्री उमाकांत पाटील यांनी आनंदव्हाळ येथे बोलताना केले. प्रकल्प संचालक आत्मा सिंधुदुर्ग, तालुका कृषी अधिकारी मालवण, जय हनुमान मंदिर ट्रस्ट आनंदव्हाळ, तसेच म.आ.वि.म अंतर्गत सिंधु कन्या यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय महोत्सवाचे आयोजन भगवती मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षपदावरून श्री पाटील बोलत होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी अमोल करंदीकर यांनी रानभाज्या संवर्धनासाठी कृषी विभाग प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगून यामध्ये शेतकऱ्यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. यावेळी रानभाज्यांचे विविध नमुने तसेच पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मालवण तालुक्यातून सुमारे 50 विविध प्रकारच्या रानभाज्या प्रदर्शनात आकर्षक पद्धतीने मांडण्यात आल्या होत्या. तसेच सुमारे 30 विविध प्रकारच्या रानभाज्यांपासून बनलेल्या पाककृती स्पर्धेमध्ये ठेवण्यात आले होत्या. यातून प्रथम 10 स्पर्धकांना पदक, प्रमाणपत्र तसेच रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. पाककृती स्पर्धेमध्ये श्रीमती राजश्री राजन कोदे,(चिन्दर ) यांनी प्रथम क्रमांक,श्रीम.रिया प्रविण मराळ (आंबडोस) यांनी द्वितीय क्रमांक तर श्रीम निता सचिन ओटवणेकर(मालवण) यांनी तृतीय क्रमांक मिळवला.यावेळी रानभाज्या अभ्यासक श्री राजाराम शृंगारे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना रानभाज्यांची लागवड, त्यांचा औषधी उपयोग, त्यांची आढळस्थाने व आहारातील महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.ग्रामपंचायत आनंदव्हाळ सरपंच सौ. रश्मी टेंबूलकर , ग्रामपंचायत कातवड सरपंच सौ. प्रतिक्षा हळदणकर , मंडळ कृषी अधिकारी आचरा अंबार्डेकर,मंडळ कृषी अधिकारी पोईप दशरथ सावंत, रानभाजी अभ्यासक श्री.मंगेश माणगावकर,परीक्षक म्हणून उद्यान पंडित श्री. शिवप्रसाद देसाई ,उद्योजिका श्रीम.कविता तळेकर श्रीम. रश्मी कुडाळकर म.आ.वि.म च्या सौ चौकेकर , जयहनुमान मंदिर ट्रस्ट अध्यक्ष श्री काशिनाथ चव्हाण तालुका कृषी अधिकारी मालवण विभागाचे उप कृषी अधिकारी, श्री. एस जी परब, श्री एस एस चव्हाण, श्रीमती आरडी थोरात, सर्व सहाय्यक कृषी अधिकारी जयहनुमान मंदिर ट्रस्ट आनंदव्हाळ चे सर्व सदस्य तसेच मालवण तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले बाबत आनंदव्हाळ सहाय्यक कृषी अधिकारी श्री किशोर कदम यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती स्नेहा खोत यांनी केले तर उप कृषी अधिकारी श्री धनंजय गावडे यांनी आभार मानले.









