पदकांबरोबरच मिळणार लाखो रुपये : क्रीडामंत्री गोविंद गावडे यांची घोषणा
पणजी : राष्ट्रीय खेळांमध्ये पदके जिंकणाऱ्या खेळाडूंना रोख पारितोषिकेही दिली जातील, अशी घोषणा क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी केली आहे. सुवर्णपदक जिंकणाऱ्याला 3 लाख ऊपये, रौप्यपदक विजेत्याला 2 लाख ऊपये आणि कांस्यपदक विजेत्याला 1 लाख ऊपये दिले जातील. तसेच विजेत्यांच्या प्रशिक्षकांनाही रोख बक्षिसे दिली जातील, अशी माहिती त्यांनी दिली. सध्या गोव्यात सुरू असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात राज्य सरकार सर्वोत्कृष्ट सेवा देण्यासाठी कोणताही प्रयत्न मागे सोडणार नाही. खेळाडू व अधिकाऱ्यांच्या सोयी, निवास, वाहतुकीची व्यवस्था याचा आढावा आपण घेतला आहे. आपण क्रीडापटूंशी संवाद साधला आहे आणि ते गोव्यातील पायाभूत सुविधांबद्दल खूश आहेत. पायाभूत सुविधा उच्च दर्जाच्या आहेत, अशी प्रतिक्रिया येत आहे. एकंदरीत राज्यभरात जे क्रीडा वातावरण तयार झाले आहे ते ऑलिम्पिक मानकांच्या बरोबरीने आहे, असेही मंत्री गावडे म्हणाले. ‘गेट, सेट, गोवा’ या भावनेने खेळांच्या यशाचे श्रेय संपूर्ण संघाला जाते. आम्ही या राष्ट्रीय खेळांचे आयोजन करण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न केले आहेत आणि अजूनही करत आहोत. तळागाळातील कर्मचारीही या खेळांना यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत, असेही त्यांनी सांगितले.









