वृत्तसंस्था/ कोलकाता
रविवारी येथे झालेल्या 1 कोटी रुपये बक्षीस रकमेच्या एसएसपी चौरासिया निमंत्रितांच्या गोल्फ स्पर्धेचे अजिंक्यपद ओमप्रकाश चौहानने पटकाविले. ओमप्रकाशच्या वैयक्तिक गोल्फ कारकिर्दीतील हे अकरावे तर 2023 च्या गोल्फ हंगामातील चौथे विजेतेपद आहे.
या स्पर्धेत रविवारी ओमप्रकाशने 70-69-70-73 असे एकूण सरासरी सिक्स अंडर 282 गुण नोंदवित विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत शनिवार अखेर ओमप्रकाश प्रतिस्पर्ध्यापेक्षा 4 शॉट्सने पुढे होता. या स्पर्धेत अमेरिकन गोल्फपटू वरुण चोप्राने फाईव्ह अंडर 283 गुणासह दुसरे स्थान पटकाविले. विजेत्या ओमप्रकाशला चषक आणि 15 लाख रुपयांचे वैयक्तिक बक्षीस देण्यात आले. 2023 च्या गोल्फ हंगामामध्ये आतापर्यंत ओमप्रकाशने आपल्या कमाईचा 1 कोटीचा आकडा पार केला आहे. उपविजेत्या वरुण चोप्राला 10 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले.









