बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना आयोजित 23 वर्षाखालील मुलांच्या आंतर मोफोसील क्रिकेट स्पर्धेचे धारवाड विभाग संघाने निर्विवाद अजिंक्यपद पटकावले संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहत सलग पाच सामने जिंकत धारवाड विभाग संघाने विजेतेपद पटकावले बेंगळूर येथे शेवटच्या लढतीत धारवाड विभाग संघाने बलाढ्या रायचूर विभाग संघाचा 49 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना धारवाड विभाग संघाने 50 षटकात 7 बाद 268 धावा केल्या. सलामीवीर सुधन्वा कुलकर्णी याने दमदार शतक झळकावताना 16 चौकार, 1 षटकारासह 126 धावा केल्या. ओमकार वेर्णेकरने 45, कृष्णा बगडी 23 धावा केल्या. रायचूरतर्फे पुनीत कुमार यांनी 3, तिपा रे•ाrने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना रायचूर विभाग संघाचा डाव 45.1 षटकात सर्वगडी बाद 219 गावात गुंडाळला गेला. तिपा रे•ाr 47, अमेय तेजस 39, विजय राज 37, भीमराव 33 धावा केल्या. धारवाड विभागतर्फे कृष्णा बागडी याने 3, मुदस्सर नजर व आदर्श हिरेमठ यांनी प्रत्येकी 2, स्वयम अप्पण्णवर, राजेंद्र डी व ओमकार गणेकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. याआधी झालेल्या सामन्यात धारवाड विभाग संघाने म्हैसूर विभाग, शिमोगा विभाग, तुमकुर विभाग व मंगळूर विभाग यांचा पराभव केला होता. या विजयी संघाला प्रशिक्षक मिलिंद चव्हाण व व्यवस्थापक महांतेश कुपनवर यांचे मार्गदर्शन तर धारवाड विभाग क्रिकेट समन्वयक निखिल भूसद यांचे प्रोत्साहन लाभले आहे. विजयी धारवाड विभाग संघात कर्णधार रोहित ए. सी., राजेंद्र डी, चिराग नायक, ध्रुव नाईक, आदर्श हिरेमठ, रोहन वाय., मुदस्सर नजर, अनिलगौडा पाटील, ओमकार वेर्णेकर, स्वयम अप्पण्णवर, सुदीप सातेरी, सम्यक पाटील, कृष्णा बॉगडी, प्रियरंजन व सुधन्वा कुलकर्णी यांचा समावेश होता.
धारवाड संघाने विजयाची घोडदौड कायम राखली : मिलिंद चव्हाण
संपूर्ण धारवाड विभागात दर्जेदार क्रिकेटपटू तयार होत आहेत. मला जबाबदारी मिळालेल्या या 23 वर्षाखालील धारवाड विभाग संघात एकापेक्षा एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडूंची भरणा होती पण त्यांना एकत्र सराव करण्याची संधी कमीच मिळाली तरीही जिद्द चिकाटी व सांघिक कामगिरीच्या जोरावर धारवाड विभागच्या संघाने अंतर मोफोसिल क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले. संघात समावेश असलेला सर्व खेळाडूंनी उत्तम कामगिरीचे प्रदर्शन केले. मुख्यत: बेळगावच्या खेळाडूंनीसुद्धा या स्पर्धेत दर्जेदार कामगिरीची नोंद केली. याआधी माझ्याकडे 19 वर्षाखालील मुलांच्या धारवाड विभाग संघाची जबाबदारी होती. प्रथमच यावर्षी 23 वर्षाखालील मुलांची जबाबदारी माझ्यावर सोपविली गेली होती. माझ्या या जबाबदारीचे या संघाने विजेतेपद पटकावून या संधीचे सोने केले, याचा मला सार्थ अभिमान आहे.