कोणत्याही परिस्थितीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांना अध्यक्षपदावरून हटवा, यासाठी असंतुष्टांचा दबाव वाढला आहे. येत्या पंधरवड्यात नव्या अध्यक्षांची घोषणा होणार आहे. सत्ताधारी काँग्रेसमधील घडामोडीही यापेक्षा काही वेगळ्या नाहीत. बुधवारी मल्लिकार्जुन खर्गे गुलबर्ग्यात होते. अप्रत्यक्षपणे प्रदेशाध्यक्ष बदलाचे संकेत त्यांनी दिले आहेत. ओडिशात अध्यक्ष बदलण्यात आला आहे. आणखी काही राज्यात बदलायचा आहे, असे सांगत कर्नाटकातही प्रदेशाध्यक्ष बदलणार, याचे सूतोवाच त्यांनी केले आहे.
कर्नाटकात सत्ताधारी काँग्रेस व प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपमधील संघर्ष एका प्रमुख वळणावर येऊन थांबला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळविलेल्या यशानंतर भाजप हायकमांडने कर्नाटकातील तिढा सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून माजी केंद्रीयमंत्री बसनगौडा पाटील-यत्नाळ यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. 72 तासात नोटीसीला उत्तर द्या नहून तुमच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नोटीसीत देण्यात आला आहे. गुरुवारी सायंकाळी उत्तर देण्यासाठी दिलेली मुदत संपते. सुरुवातीला तर आपल्याला अद्याप नोटीस पोहोचली नाही, पोहोचलीच तर भाजपमध्ये सध्या काय परिस्थिती आहे, याविषयी हायकमांडला आपण सविस्तर माहिती देऊ, अशी भूमिका बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी जाहीर केली आहे. त्यांना मिळालेली ही दुसरी नोटीस आहे. या नोटीसीत त्याचा उल्लेखही आहे. यापूर्वी तुम्हाला नोटीस देण्यात आली होती, वागणूक सुधारून घेण्याची ग्वाही दिली होती, मात्र त्यामध्ये काही फरक पडला नाही. तुमच्यावर कारवाई का करू नये? असा उल्लेख नोटीसीत करण्यात आला आहे.
कोणत्याही परिस्थितीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांना अध्यक्षपदावरून हटवा, यासाठी असंतुष्टांचा दबाव वाढला आहे. येत्या पंधरवड्यात नव्या अध्यक्षांची घोषणा होणार आहे. विजयेंद्र यांचीच प्रदेशाध्यक्षपदावर पुन्हा वर्णी लागणार की भाजपला नवे सारथी मिळणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत विजयेंद्र यांनाच कायम करू नये, या मागणीवर असंतुष्ट नेते अडून राहिले आहेत. नवी दिल्लीतील घडामोडी लक्षात घेता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कर्नाटकातील तिढा सोडवण्यासाठी कर्नाटकातील नेत्यांशी चर्चा करण्याचे ठरवले असले तरी विजयेंद्र यांच्याविरुद्ध आघाडी उघडलेल्या नेत्यांना मात्र हायकमांडने म्हणावा तसा थारा दिला नाही, हे दिसून येते. विजयेंद्र यांना अध्यक्षपदावरून मुक्त करून त्यांच्या जागी केंद्रीयमंत्री व्ही. सोमण्णा, माजी मुख्यमंत्री खासदार बसवराज बोम्माई, माजी मंत्री मुरगेश निराणी यापैकी कोणत्याही नेत्याला प्रदेशाध्यक्षपद द्यावे, यासंबंधीच्या चर्चेने उचल खाल्ली आहे. बसनगौडा पाटील-यत्नाळ यांना नोटीस दिल्यामुळे बंडोबांना धक्का बसला आहे.
खासदार डॉ. के. सुधाकर यांनी चिक्कबळ्ळापूर जिल्हा अध्यक्षपदी बी. संदीप यांच्या निवडीला विरोध केला होता. याच मुद्द्यावर डॉ. सुधाकर यांनी बी. वाय. विजयेंद्र यांच्यावर सडकून टीका केली होती. हायकमांडने याचीही दखल घेतली आहे. बी. संदीप यांच्या निवडीचा निर्णय सध्या रोखला आहे. पक्षाचे प्रभारी डॉ. राधा मोहनदास अगरवाल यांनी विजयेंद्र यांना पत्र पाठवून बी. संदीप यांची निवड रोखण्याची सूचना केली आहे. या निर्णयाने विजयेंद्र यांनाही धक्का देण्यात आला आहे. बसनगौडा पाटील-यत्नाळ यांना नोटीस दिल्याप्रमाणेच चिक्कबळ्ळापूर जिल्हाध्यक्षांची निवड रोखून विजयेंद्र गटालाही हायकमांडने गर्भित इशाराच दिला आहे. पक्षासंबंधी निर्णय घेताना सर्वांना सोबत घेऊन जावे लागते. कर्नाटकात अलीकडचे काही निर्णय लक्षात घेता ते एकतर्फी असल्याचे तक्रारी वाढल्या होत्या. हायकमांडने याचीही दखल घेतली आहे. सद्यपरिस्थितीत तरी प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा विजयेंद्र यांची निवड करण्याकडे हायकमांडचा कल असल्याचे दिसून येते. तो निर्णय जाहीर करण्याआधीच असंतुष्टांना थंड करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणूनच बसनगौडा पाटील-यत्नाळ यांना नोटीस धाडण्यात आली आहे.
केंद्रीयमंत्री व्ही. सोमण्णा यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी सोमवारी 10 फेब्रुवारी रोजी पूजा होती. या पूजेला कर्नाटकातील भाजप नेत्यांनी हजेरी लावली होती. बसनगौडा पाटील-यत्नाळ यांच्या नेतृत्वाखालील असंतुष्टही नवी दिल्लीला पोहोचले होते. याचवेळी प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र हेही दिल्लीला गेले होते. मात्र, ते पूजेला गेले नाहीत. आजपर्यंत आपण तटस्थ असल्याचे जे सांगत होते, ते बसवराज बोम्माई असंतुष्टांबरोबर सोमण्णा यांच्या निवासस्थानी दिसून आले. लवकरच पक्षांतर्गत समस्येवर तोडगा निघेल, असा विश्वास विरोधी पक्षनेते आर. अशोक व माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी व्यक्त केला आहे. प्रदेशाध्यक्षांविरुद्ध उघडपणे दंड थोपटलेल्या बसनगौडा पाटील-यत्नाळ व त्यांच्या समर्थकांना हायकमांड कसे शांत करणार, हा प्रश्न आहे. कारण ‘विजयेंद्र हटाव, भाजप बचाव’ हा एकमेव कार्यक्रम असंतुष्टांनी हाती घेतला आहे. त्यांचा दबाव डावलून जर विजयेंद्र यांनाच प्रदेशाध्यक्षपदावर कायम केले तर हा संघर्ष आणखी वाढणार आहे. दोन्ही गटांना एकत्र आणून चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याची वेळही निघून गेली आहे. कारण हा संघर्ष हाताबाहेर गेला आहे. बसनगौडा पाटील यांच्यावर कारवाई केल्यास त्याचेही पडसाद उमटणार आहेत. कारण पंचमसाली समाजाचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. समाजावर इतर नेत्यांपेक्षाही त्यांची पकड अधिक घट्ट आहे. या घडामोडी सुरू असतानाच माजी मंत्री बी. श्रीरामुलू यांनी पक्षाने जर आपल्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविल्यास यशस्वीपणे ती पार पाडण्याची आपली तयारी आहे, असे सांगितले आहे. या संघर्षावर येत्या पंधरवड्यात तोडगा निघण्याची अपेक्षा आहे.
सत्ताधारी काँग्रेसमधील घडामोडीही यापेक्षा काही वेगळ्या नाहीत. ‘एक व्यक्ती एक पद’ या मागणीसाठी दलित नेत्यांनी हायकमांडवर दबाव वाढवला आहे. गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर, बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी आदी नेत्यांनी एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन पक्षातील सध्याच्या घडामोडींबद्दल चर्चा केली आहे. बुधवारी मल्लिकार्जुन खर्गे गुलबर्ग्यात होते. अप्रत्यक्षपणे प्रदेशाध्यक्ष बदलाचे संकेत त्यांनी दिले आहेत. ओडिशात अध्यक्ष बदलण्यात आला आहे. आणखी काही राज्यात बदलायचा आहे, असे सांगत कर्नाटकातही प्रदेशाध्यक्ष बदलणार, याचे सूतोवाच त्यांनी केले आहे.
गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या जेवणावळीला हायकमांडच्या माध्यमातून रोखण्याचे काम उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केले होते. तेव्हापासून शिवकुमारविरुद्ध काँग्रेसमधील दलित नेते असा संघर्ष वाढला आहे. अनुसूचित जाती-जमातीचा मेळावा भरवण्यासाठी तयारी सुरू होती. त्यालाही ब्रेक लावण्यात आला होता. पक्षाच्या व्यासपीठावरूनच मेळावा भरवण्याचा सल्ला या नेत्यांना देण्यात आला होता. तेव्हापासून हा संघर्ष वाढला. भाजपप्रमाणेच काँग्रेसमध्येही प्रदेशाध्यक्ष बदलण्यासाठी हायकमांडवर दबाव वाढला आहे.








