द. आफ्रिकेचा 4 गड्यांनी पराभव, जोसेफ ‘सामनावीर’
वृत्तसंस्था/केव्ह हिल
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत विंडीज महिला क्रिकेट संघाने विजयी सलामी देताना पहिल्या लढतीत द. आफ्रिकेचा डकवर्थ लेव्हीस नियमाच्या आधारे चार गड्यांनी पराभव केला. या सामन्यात 58 चेंडूत 60 धावा जमविणाऱ्या विंडीजच्या क्विना जोसेफला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यात द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 232 धावा जमविल्या. त्यानंतर पावसाचा अडथळा आल्याने खेळ बराचवेळ थांबविण्यात आला. पाऊस थांबल्यानंतर पंचांनी डकवर्थ लेव्हीस नियमाच्या आधारे विंडीजला निर्णायक विजयासाठी 34 षटकात 180 धावांचे नवे उद्दिष्ट दिले. विंडीजने 32 षटकात 6 बाद 180 धावा जमवित विजय नोंदविला.
द. आफ्रिकेच्या डावात सलामीच्या ब्रिट्सने 65 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 57 धावा जमविताना कर्णधार वूलव्हर्ट समवेत सलामीच्या गड्यासाठी 73 धावांची भागिदारी केली. वूलव्हर्टने 49 धावांत 2 चौकारांसह 27 धावा जमविल्या. लूसने 53 चेंडूत 2 चौकारांसह 32, जेफ्ताने 2 चौकारासह 20, डी. क्लर्कने 38 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 42, खाकाने 3 चौकारांसह 18 धावा जमविल्या. द. आफ्रिकेच्या डावात 3 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे रामहॅरेक तसेच अॅलेनी यांनी प्रत्येकी 2 तर ग्लास्गो, मॅथ्युज, फ्लेचर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना कर्णधार मॅथ्युज आणि जोसेफ या सलामीच्या जोडीने विंडीजच्या डावाला दमदार सुरुवात करुन देताना 14 षटकात 88 धावांची भागिदारी केली. मॅथ्युजने 44 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 40 तर जोसेफने 58 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारासह 60 धावा झोडपल्या. ग्रीमाँड 5 धावांवर बाद झाली. स्टिफेनी टेलरने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 34 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 30 धावा जमविल्या. हेन्रीने 2 चौकारांसह 11, कॅम्पबेलने 1 षटकारासह 10, तर ग्लास्गोने 1 षटकार आणि 1 चौकारासह 12 धावा जमविल्या. विंडीजच्या डावात 5 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले. द. आफ्रिकेतर्फे हलुबीने 50 धावांत 3 तर मलाबा आणि शेनगेसी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
द. आफ्रिका 50 षटकात 9 बाद 232 (ब्रिट्स 57, वूलव्हर्ट 27, लूस 32, जेफ्ता 20, डी. क्लर्क 42, खाका 18, अवांतर 17, रामहरक आणि अॅलेनी प्रत्येकी 2 बळी, ग्लास्गो, मॅथ्युज, फ्लेचर प्रत्येकी 1 बळी), विंडीज (34 षटकात 180 धावांचे नवे उद्दिष्ट), 32 षटकात 6 बाद 180 (जोसेफ 60, मॅथ्युज 40, टेलर नाबाद 30, हेन्री 10, ग्लास्गो 12, अवांतर 11, हलुबी 3-50, मलाबा व शेनगेसी प्रत्येकी 1 बळी)









