टी-20 मालिका, अष्टपैलू होल्डर सामनावीर
वृत्तसंस्था/ लॉडेरहिल (अमेरिका)
सामनावीर जेसन होल्डरच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर यजमान विंडीजने 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत पाकशी बरोबरी साधताना दुसऱ्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकून 2 गड्यांनी विजय मिळविला. या सामन्यात जेसन होल्डरने गोलंदाजी करताना 19 धावांत 4 गडी बाद केले तर त्याने फलंदाजी करताना शेवटच्या चेंडूवर विजयी चौकार ठोकला. होल्डरने या सामन्यात 2 अप्रतिम झेलही घेतले.
या मालिकेतील पहिला सामना पाकने जिंकून विंडीजवर आघाडी मिळवली होती. दुसऱ्या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकने 20 षटकात 9 बाद 133 धावा जमविल्या. विंडीजने 20 षटकात 8 बाद 135 धावा जमवित हा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
पाकच्या डावामध्ये केवळ 3 फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. हसन नवादने 23 चेंडूत 4 षटकार आणि 1 चौकारासह 40 तर कर्णधार सलमान आगाने 33 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 38 धावा जमविल्या. फक्र झमानने 19 चेंडूत 2 चौकारांसह 20 धावा केल्या. आगा आणि नवाज यांनी पाचव्या गड्यासाठी 60 धावांची भागिदारी केली. पाकने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 24 धावा जमविताना 3 गडी गमाविले. पाकचे अर्धशतक 54 चेंडूत, शतक 89 चेंडूत नोंदविले गेले. आगा सलमान आणि हसन नवाज यांनी पाचव्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी 34 चेंडूत नोंदविली. पाकच्या डावामध्ये 5 षटकार आणि 7 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे होल्डरने 19 धावांत 4 तर अखिल हुसेन, शमार जोसेफ व रॉस्टन चेस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. मोतीने 2 बळी मिळविले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजच्या डावामध्ये गुडाकेश मोतीने 20 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 28, कर्णधार होपने 30 चेंडूत 2 चौकारांसह 21, चेसने 16, होल्डरने 10 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 16, शेफर्डने 11 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 15, अँड्रीव्हने 1 षटकार आणि 1 चौकारासह 12 धावा केल्या. विंडीजच्या डावात 5 षटकार आणि 8 चौकार नोंदविले गेले. विंडीजने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 34 धावा जमविताना 2 गडी गमाविले. विंडीजचे अर्धशतक 58 चेंडूत तर शतक 106 चेंडूत फलकावर लागले. 10 षटकाअखेर विंडीजने 3 बाद 52 धावा जमविल्या होत्या. पाकतर्फे मोहम्मद नवाजने 14 धावांत 3, सईम आयुबने 20 धावांत 2 तसेच शाहिन आफ्रीदी व सुफियान मुक्किम यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.
विंडीज संघाचा अलिकडच्या कालावधीतील सलग 7 सामन्यानंतरचा हा पहिला विजय आहे. विंडीजला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत 5-0 असा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर पाकविरुद्धच्या मालिकेतील त्यांना पहिल्या सामन्यात हार पत्करावी लागली होती. आता या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना येथे रविवारी होत आहे.
संक्षिप्त धावफलक – पाक 20 षटकात 9 बाद 133 (हसन नवाज 40, सलमान आगा 38, फख्र झमान 20, अवांतर 8, होल्डर 4-19, मोती 2-29, चेस, अखिल हुसेन व शमार जोसेफ प्रत्येकी 1 बळी), विंडीज 20 षटकात 8 बाद 135 (मोती 28, होप 21, होल्डर नाबाद 16, शेफर्ड 15, चेस 16, अँड्रीव्ह 12, अवांतर 11, मोहम्मद नवाज 3-14, सईम आयुब 2-20, शाहिन आफ्रीदी व सोफीयान मुक्कीम प्रत्येकी 1 बळी).









