वृत्तसंस्था /हरारे
चालू वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत स्थान मिळविण्यासाठी झिंबाब्वेत सुरु असलेल्या विश्वचषक पात्रता फेरी स्पर्धेत अ गटातील सामन्यात विंडीजने नेपाळचा 101 धावांनी दणदणीत पराभव केला. विंडीजच्या 132 धावा करणाऱ्या शाय होपला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यात नेपाळने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी दिली. विंडीजने 50 षटकात 7 बाद 339 धावा जमविल्या. कर्णधार शाय होप आणि निकोलस पूरन यांनी दमदार शतके झळकाविताना चौथ्या गड्यासाठी 216 धावांची भागिदारी केली. कर्णधार होपने 129 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारांसह 132 तर पूरनने 94 चेंडूत 4 षटकार आणि 10 चौकारांसह 115 धावा झळकाविल्या. किंगने 42 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 32, पॉवेलने 14 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 29, होल्डरने 2 चौकारांसह नाबाद 16 धावा जमविल्या. विंडीजच्या डावात 10 षटकार आणि 27 चौकार नोंदविले गेले. नेपाळतर्फे ललित राजवंशीने 52 धावात 3 तर करण, झा, लिमचेनी, दीपेंद्रसिंग एरी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना नेपाळचा डाव 49.4 षटकात 238 डावात आटोपला. नेपाळच्या डावात अरिफ शेखने 93 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 64, कर्णधार रोहित पॉडेलने 43 चेंडूत 3 चौकारांसह 30, असिफ शेखने 36 चेंडूत 3 चौकारांसह 28, दिपेंद्रसिंगने 20 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 23, गुलशन झाने 58 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 42, करणने 27 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 28 धावा जमविल्या. नेपाळच्या डावात 4 षटकार आणि 23 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे होल्डरने 3 तर जोसेफ, पॉल, अकिल हुसेन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. मेयर्सने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
विंडीज : 50 षटकात 7 बाद 339 (शाय होप 132, पूरन 115, किंग 32, पॉवेल 29, होल्डर 16, राजवंशी 3-52, करण, गुलशन, लामिचेनी, दीपेंद्रसिंग एरी प्रत्येकी 1 बळी), नेपाळ : 49.4 षटकात सर्व बाद 238 (अरिफ शेख 63, रोहित पॉडेल 30, असिफ शेख 28, दीपेंद्रसिंग 23, गुलशन झा 42, करण 28, होल्डर 3-34, जोसेफ 2-45, पॉल 2-63, अकिल हुसेन 2-49, मेयर्स 1-37).









