ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा मालिका विजय : रसेल सामनावीर, वॉर्नर मालिकावीर
वृत्तसंस्था/ पर्थ
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील येथे मंगळवारी झालेल्या शेवटच्या सामन्यात विंडीजने ऑस्ट्रेलियाचा 37 धावांनी पराभव केला. या सामन्यात सामनावीर आंद्रे रसेलने शानदार अर्धशतक (71) झळकविले. विंडीजच्या रुदरफोर्डने नाबाद अर्धशतक (67) नोंदविले. मात्र मालिकावीर डेव्हिड वॉर्नरने अर्धशतक (81) वाया गेले. या मालिकेतील पहिले दोन सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले असल्याने विंडीजला हा शेवटचा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉशपासून रोखले.
या शेवटच्या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 220 धावा जमविल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 5 बाद 183 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 37 धावांनी गमवावा लागला.
विंडीजच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. त्यांचे पहिले 3 फलंदाज केवळ 17 चेंडूत 17 धावात तंबूत परतले होते. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाच्या बार्टलेटने चार्ल्सला 4 धावावर झेलबाद केले. त्यानंतर बेरेनडॉर्फने पूरनला एका धावेवर मॅक्सवेलकरवी झेलबाद केले. बार्टलेटने मेयर्सचा त्रिफळा उडविला. त्याने 2 चौकारांसह 11 धावा जमविल्या. रॉयस्टन चेस आणि कर्णधार पॉवेल यांनी चौथ्या गड्यासाठी 55 धावांची भागिदारी 30 चेंडूत नोंदविली. झाम्पाने चेसचा त्रिफळा उडविला. त्याने 20 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 37 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या हार्डीने कर्णधार पॉवेलला झेलबाद केले. त्याने 14 चेंडूत 3 चौकारांसह 21 धावा जमविल्या. विंडीजची स्थिती यावेळी 5 बाद 79 अशी होती.
रुदरफोर्ड आणि आंद्रे रसेल यांनी सहाव्या गड्यासाठी 54 चेंडूत 139 धावांची भागिदारी केल्याने विंडीजला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. रुदरफोर्डने 40 चेंडूत 5 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 67 तर रसेलने 29 चेंडूत 7 षटकार आणि 4 चौकारांसह 71 धावा झोडपल्या. रसेल शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर बाद झाला. शेफर्ड 2 धावावर नाबाद राहिला. विंडीजच्या डावात 14 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे बार्टलेटने 2 तर बेहरेनडॉर्फ, जॉनसन, हार्डी आणि झाम्पा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना कर्णधार मिचेल मार्श आणि वॉर्नर यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाला दमदार प्रारंभ केला. या जोडीने 39 चेंडूत 68 धावांची भागिदारी केली. अकिल हुसेनने कर्णधार मार्शला होल्डरकरवी झेलबाद केले. त्याने 13 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 17 धावा जमविल्या. मार्श बाद झाल्यानंतर वॉर्नर आणि हार्डी यांनी दुसऱ्या गड्यासाठी 36 चेंडूत 46 धावांची भर घातली. शेफर्डच्या गोलंदाजीवर हार्डीचा त्रिफळा उडाला. त्याने 16 चेंडूत 2 चौकारांसह 16 धावा जमविल्या. सलामीच्या वॉर्नरने 49 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारांसह 81 धावा झळकविल्या. रॉयस्टन चेसने वॉर्नरला झेलबाद केले. चेसने आपल्या याच षटकातील शेवटच्या चेंडूवर इंग्लिसला टिपले. त्याने एक धाव जमविली. शेफर्डने मॅक्सवेलचा त्रिफळा उडविला. त्याने 14 चेंडूत 2 चौकारांसह 12 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाची यावेळी स्थिती 17.2 षटकात 5 बाद 152 अशी होती. टीम डेव्हिडने 19 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 41 तर वेडने नाबाद 7 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 8 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या पॉवरेप्ले दरम्यानच्या 6 षटकात 61 धावा झोडपल्या. ऑस्ट्रेलियाचे पहिले अर्धशतक 32 चेंडूत, शतक 61 चेंडूत तर दीडशतक 103 चेंडूत नोंदविले गेले. वॉर्नरने 3 षटकार आणि 6 चौकारांसह 25 चेंडूत आपले अर्धशतक झळकविले. मात्र या सामन्यात वॉर्नरचे अर्धशतक वाया गेले.
संक्षिप्त धावफलक : विंडीज 20 षटकात 6 बाद 220 (चार्ल्स 4, मेयर्स 11, पूरन 1, चेस 37, पॉवेल 21, रुदरफोर्ड नाबाद 67, आंद्रे रसेल 71, शेफर्ड नाबाद 2, अवांतर 6, बार्टलेट 2-37, बेहरेनडॉर्फ, जॉनसन, हार्डी, झाम्पा प्रत्येकी 1 बळी), ऑस्ट्रेलिया 20 षटकात 5 बाद 183 (मार्श 17, वॉर्नर 81, हार्डी 16, इंग्लिस 1, मॅक्सवेल 12, डेव्हिड नाबाद 41, वेड नाबाद 7, अवांतर 8, शेफर्ड 2-31, चेस 2-19, अकिल हुसेन 1-33).









