शेवटच्या सामन्यात विंडीजची 8 गड्यांनी मात, मॅथ्यू फोर्ड ‘मालिकावीर’, ब्रेन्डॉन किंग ‘सामनावीर’
वृत्तसंस्था/ब्रिजटाऊन (बार्बाडोस)
यजमान विंडीजने इंग्लंड विरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. या मालिकेतील झालेल्या शेवटच्या आणि निर्णायक सामन्यात विंडीजने इंग्लंडचा 42 चेंडू बाकी ठेवून 8 गड्यांनी दणदणीत पराभव केला. विंडीजच्या मॅथ्यू फोर्डला ‘मालिकावीर’ तर ब्रेन्डॉन किंगला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. या शेवटच्या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंडने 50 षटकात 8 बाद 263 धावा जमवित विंडीजला विजयासाठी 264 धावांचे आव्हान दिले. विंडीजने 43 षटकात 2 बाद 267 धावा जमवित सामना आणि मालिका जिंकली.
इंग्लंडच्या डावामध्ये सलामीच्या सॉल्टने 108 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 74, मोस्लेने 70 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 57, सॅम करनने 52 चेंडूत 4 चौकारांसह 40, ओव्हरटनने 21 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 32, आर्चरने 17 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 38 धावा जमविल्या. जॅक्स, बेथेल, कॉक्स आणि कर्णधार लिव्हिंगस्टोन यांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. इंग्लंडचा निम्मा संघ 94 धावांत तंबूत परतल्यानंतर सॉल्ट आणि सॅम करन यांनी सहाव्या गड्यासाठी 70 धावांची भागिदारी केली. सॉल्ट बाद झाल्यानंतर करन आणि मोस्ले यांनी सातव्या गड्यासाठी 43 धावांची भर घातली. इंग्लंडच्या डावामध्ये 6 षटकार आणि 21 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडने पहिल्या पॉवरप्लेच्या 10 षटकात 24 धावा जमविताना 4 गडी गमविले. सॉल्टने अर्धशतक 79 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने तर मोस्लेने 64 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने झळकविले.









