वृत्तसंस्था/ ऍडलेड
यजमान ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत विंडीजचा 2-0 असा एकतर्फी पराभव केला. या मालिकेतील येथे रविवारी खेळाच्या चौथ्या दिवशी दुसऱया सामन्यात ऑस्ट्रेलियात विंडीजचा 419 धावांनी दणदणीत पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या मॅरनस लाबुशेनला ‘मालिकावीर’ तर ट्रेविस हेडला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. ही दुसरी कसोटी ऍडलेडच्या मैदानावर दिवस-रात्रीची खेळवण्यात आली. ऑस्ट्रेलियाने हा शेवटचा सामना चार दिवसातच जिंकला.
या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने विंडीजला निर्णायक विजयासाठी 497 धावांचे अशक्यप्राय आव्हान दिले होते. विंडीजने 4 बाद 38 या धावसंख्येवरून चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. आणि त्यांचे उर्वरित सहा गडी केवळ 39 धावांची भर घालत उपाहारापूर्वीच बाद झाले. या मालिकेतील पर्थची पहिली कसोटी ऑस्ट्रेलियानी 164 धावांनी जिंकली. या कसोटी मालिकेत विंडीजची कामगिरी दर्जेदार झाली नाही. आता या कसोटी मालिकेनंतर ऑस्ट्रेलियन संघ दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून या मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेनच्या गब्बा मैदानावर येत्या शनिवारपासून खेळविला जाईल. ऑस्ट्रेलियन संघाने मायदेशात आतापर्यंत झालेल्या दिवस-रात्रीच्या कसोटी सामन्यात एकही पराभव स्वीकारलेला नाही.

या दुसऱया आणि शेवटच्या कसोटीत खेळाच्या तिसऱया दिवसाअखेर विंडीजचे थॉमस आणि होल्डर हे फलंदाज नाबाद राहिले होते. चौथ्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या स्टार्कने थॉमसला 12 धावावर झेलबाद केले. त्यानंतर स्टार्कने होल्डरचा 11 धावावर त्रिफळा उडवला. नवोदित नेसरने चेसला 13 धावर त्यानंतर डिसिल्वाला 15 धावार झेलबाद केले. लियॉनने जोसेफचा तीन धावावर त्रिफळा उडवला. शेवटी नेसरने नवोदित मिंडलेला खाते उघडण्यापूर्वीच बाद करून विंडीजला दुसऱया डावात 40.5 षटकात 77 धावावर रोखले. विंडीजच्या एकाही फलंदाजाला 20 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. ऑस्ट्रेलियातर्फे स्टार्क, नेसर आणि बोलँड यांनी प्रत्येकी 3 तर लियॉनने एक गडी बाद केला. 2003 पासून विंडीज संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये विजय मिळवता आलेला नाही. तसेच त्यांना 1992-93 नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या लाबुशेनने पहिल्या डावात 163 तर हेडने 175 धावा झळकवल्या. तसेच त्याने पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात द्विशतक तर दुसऱया डावात शतक नोंदवले होते. या मालिकेत लाबुशेनने एक द्विशतक आणि दोन शतके झळकविली आहेत.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया प. डाव- 137 षटकात 7 बाद 511 डाव घोषित, विंडीज प. डाव 69.3 षटकात सर्व बाद 214, ऑस्ट्रेलिया दु. डाव 31 षटकात 6 बाद 199 डाव घोषित, विंडीज दु. डाव 40.5 षटकात सर्व बाद 77 (चंद्रपॉल 17, थॉमस 12, होल्डर 11, डिसिल्वा 15, चेस 13, स्टार्क 3-29, नेसर 3-22, बोलँड 3-16, लियॉन 1-8).









