वृत्तसंस्था/सेंट जोन्स (अॅन्टीग्वा)
यजमान विंडीज आणि द. आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला 24 ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे. या मालिकेसाठी क्रिकेट विंडीजने आपल्या संघाची घोषणा केली. विंडीजच्या निवड समितीने या मालिकेसाठी महत्वाच्या अष्टपैलु खेळाडूंना विश्रांती दिली आहे. पॉवेलकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले असून रोस्टन चेस उपकर्णधार म्हणून राहिल.
द. आफ्रिका संघाने विंडीजच्या दौऱ्यामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली आहे. सदर कसोटी मालिका आयसीसीच्या विश्वकसोटी चॅम्पियनशीप अंतर्गत खेळविली गेली. द. आफ्रिकेचा संघ आता टी-20 मालिका जिंकण्यासाठी सज्ज झालाआहे. मात्र अलिकडच्या कालावधीत टी-20 प्रकारात विंडीज संघाची कामगिरी समाधानकारक झाल्याने ही मालिका एकतर्फी होणार नाही, अशी अपेक्षा आहे. विंडीजने अलिकडच्या कालावधीत झालेल्या पाच द्विपक्षीय टी-20 मालिकांपैकी 4 मालिका जिंकल्या आहेत. निवडण्यात आलेल्या विंडीज संघामध्ये ज्येष्ठ अष्टपैलु आंद्रे रसेल, जेसन होल्डर यांना विश्रांती देण्यात आली आहे. मात्र अॅलिक अॅथांजेचा संघात समावेश करण्यात आला आहे. विंडीज संघामध्ये 22 वर्षीय वेगवान गोलंदाज मॅथ्यु फोर्डचा समावेश करण्यात आला आहे. तीन सामन्यांची टी-20 मालिका 24 ते 28 ऑगस्ट दरम्यान खेळविली जाईल.
विंडीज संघ: रोवमन पॉवेल (कर्णधार), रोस्टन चेस (उपकर्णधार), अॅलिक अथांजे, चार्ल्स, मॅथ्यु फोर्ड, हेटमायर, अॅलेन, शाय हॉप, अकिल हुसेन, शमार जोसेफ, मॅकॉय, मोती, पूरन, रुदरफोर्ड, शेफर्ड