भारताचा 6 गड्यांनी पराभव, शेफर्ड, मोती, कर्णधार होप प्रभावी
वृत्तसंस्था/ ब्रिजटाऊन
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत येथे शनिवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात यजमान विंडीजने भारताचा सहा गड्यांनी पराभव केला. या विजयामुळे विंडीजने या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यात उसळत्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे त्यांना हा सामना गमवावा लागला. या सामन्यात पावसाचा वारंवार अडथळा आल्याने खेळ काही वेळ थांबवावा लागला होता.
या सामन्यात विंडीजच्या शेफर्ड आणि मॉटी तसेच जोसेफ यांनी अचूक गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांना फटकेबाजीपासून रोखण्यात यश मिळवले. त्यानंतर कर्णधार शाय हॉप, कार्टी आणि मेयर्स यांनी समयोचित फलंदाजी करत आपल्या संघाला तब्बल 13 षटके बाकी ठेवून सहा गड्यांनी विजय मिळवून दिला. कर्णधार शर्मा आणि कोहली यांना या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती आणि हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवण्यात आले होते. इशान किशन आणि गिल वगळता भारताच्या इतर फलंदाजांना या उसळत्या खेळपट्टीवर धावा जमवता आल्या नाहीत. इशान किसनने अर्धशतक (55), गिलने 34 तर सूर्यकुमार यादवने 24 धावा जमवल्या. विंडीजच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून भारतीय फलंदाजांना झटपट बाद केले. गिल आणि किसन यांनी सलामीच्या गड्यासाठी 90 धावांची भागीदारी केल्यानंतर भारतीय फलंदाजी कोलमडली. विंडीजचे क्षेत्ररक्षणही दर्जेदार झाले. भारताचा डाव 40.5 षटकात 181 धावात आटोपला. शेफर्ड आणि मॉटी यांनी प्रत्येकी 3 तर जोसेफने 2 गडी बाद केले. सिलिस आणि कॅरे यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. भारताच्या डावामध्ये 1 षटकार आणि 18 चौकार नोंदवले गेले. भारताने पहिल्या पॉवर प्ले दरम्यान 49 धावा जमवताना एकही गडी गमवला नाही. त्यानंतर दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये त्यांनी 131 धावा जमवताना 9 गडी गमवले. शेवटच्या 10 षटकामध्ये भारताने 50 धावा जमवताना एक गडी गमवला.
विंडीजच्या डावाला किंग आणि मेयर्स यांनी सावध सुरुवात करून देताना 8.2 षटकात 53 धावांची भागीदारी केली. या जोडीने 49 चेंडूत अर्धशतकी भागीदारी केली. विंडीजने पहिल्या पॉवरप्लेमध्ये 64 धावा जमवताना दोन गडी गमवले. शार्दुल ठाकुरने भारताला पहिले यश मिळवून देताना मेयर्सला उमरान मलिककरवी झेलबाद केले. मेयर्सने 28 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 36 धावा जमवल्या. यानंतर ठाकुरने आपल्या याच षटकातील चौथ्या चेंडूवर किंगला पायचित केले. त्याने 23 चेंडूत 3 चौकारांसह 15 धावा जमवल्या. ठाकुरने अॅथेन्झला 6 धावावर झेलबाद केले. विंडीजची यावेळी स्थिती 12.2 षटकात 3 बाद 72 अशी होती. कर्णधार पांड्याने गोलंदाजीत वारंवार बदल केला पण तो फार यशस्वी ठरला नाही. हेटमेयर कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. त्याने 15 चेंडूत 9 धावा केल्या. विंडीजने यावेळी 17 षटकात 4 बाद 91 धावा जमवल्या होत्या.
कर्णधार शाय हॉप आणि कार्टी यांनी एकेरी आणि दुहेरी धावांवर भर देत धावफलक हलता ठेवला. विंडीजचे शतक 128 चेंडूवर फलकावर लागले तर या जोडीने पाचव्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी 84 चेंडूत पूर्ण केली. विंडीजचे दीडशतक 194 चेंडूत नोंदवले गेले. कर्णधार हॉपने 70 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह अर्धशतक झळकविले. या जोडीने पाचव्या गड्यासाठी अभेद्य 91 धावांची भागीदारी 19.2 षटकात नोंदवत आपल्या संघाला 6 गड्यांनी विजय मिळवून दिला. कर्णधार हॉपने 80 चेंडुत 2 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 63 तर कार्टीन 65 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 48 धावा जमवल्या. विंडीजच्या डावामध्ये 4 षटकार आणि 13 चौकार नोंदवले गेले. विंडीजने दुसऱ्या पॉवरप्ले दरम्यान 118 धावा जमवताना दोन गडी गमवले. भारतीय संघात स्थान मिळालेल्या नवोदित खेळाडूंना या संधीचा फायदा घेता आला नाही. भारतीय फिरकी गोलंदाजी या खेळपट्टीवर प्रभावी ठरू शकली नाही. भारतातर्फे शार्दुल ठाकुरने 42 धावात 3 तर कुलदीप यादवने 30 धावात एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : भारत 40.5 षटकात सर्वबाद 181 (इशान किसन 1 षटकार आणि 6 चौकारांसह 55, गिल 5 चौकारांसह 34, सॅमसन 9, अक्षर पटेल 1, पांड्या 7, सूर्यकुमार यादव 3 चौकारांसह 24, जडेजा 10, शार्दुल ठाकुर 2 चौकारांसह 16, कुलदीप यादव नाबाद 8, उमरान मलिक 0, मुकेशकुमार 6, अवांतर 11, शेफर्ड 3-37, मॉटी 3-36, जोसेफ 2-35, सिलेस, कॅरे प्रत्येकी एक बळी), विंडीज 36.4 षटकात 4 बाद 182 (किंग 3 चौकारांसह 15, मेयर्स 2 षटकार आणि 4 चौकारांसह 36, अॅथेन्झ 6, शाय हॉप 80 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 63, हेटमेयर 9, कार्टी 65 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 48, अवांतर 5, शार्दुल ठाकुर 3-42, कुलदीप यादव 1-30).









