किरण ठाकुर यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना दिल्या शुभेच्छा
बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी सीमाभागात वातावरण ढवळून निघाले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना सर्वथरातून भरघोस पाठिंबा मिळत आहे. सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते व तरुण भारतचे सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी समितीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी व्हा, अशा शुभेच्छा दिल्या. सोमवारी बेळगाव दक्षिणचे उमेदवार रमाकांत कोंडुस्कर, बेळगाव उत्तरचे उमेदवार अमर येळ्ळूरकर, बेळगाव ग्रामीणचे उमेदवार आर. एम. चौगुले, खानापूरचे उमेदवार मुरलीधर पाटील यांनी तरुण भारत कार्यालयाला भेट देऊन संस्थापक बाबुराव ठाकुर यांच्या प्रतिमेला वंदन केले. यावेळी किरण ठाकुर यांनी विजयासाठी म. ए. समितीच्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. गेले काही दिवस प्रकृती स्वास्थ्यासाठी किरण ठाकुर पुण्यात औषधोपचार घेत होते. पुण्याहून बेळगावला आल्यानंतर म. ए. समितीच्या उमेदवारांनी त्यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील जनतेच्या शुभेच्छा घेऊन आपण येथे आलो आहोत. कधी नव्हे इतकी सीमाभागात मराठी माणसांची एकजूट दिसून येत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण झाले आहे. उत्साही वातावरणामुळे म. ए. समितीच्या उमेदवारांच्या विजयाची खात्री निर्माण झाली आहे. सीमालढ्याचा एक भाग म्हणून 66 वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. लोकशाहीत निवडणुकीला एक वेगळेच महत्त्व आहे. आजवर म. ए. समितीने अनेक निवडणुका जिंकल्या आहेत. आताही जिंकणे सर्व न्यायप्रेमी जनतेसाठी महत्त्वाचे आहे, असे किरण ठाकुर यांनी सांगितले. वेळोवेळी मराठी जनतेने आपले मत मतपेटीच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. आता पुन्हा ही एक संधी आहे. सीमावासियांच्या दीर्घ लढ्याला यश मिळो, अशी प्रार्थनाही किरण ठाकुर यांनी केली. यमकनमर्डी मतदारसंघातील म. ए. समितीचे उमेदवार मारुती नाईक यांनाही शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख किरण गावडे, शामराव पाटील, बाळू जोशी, सुनील बाळेकुंद्री आदी उपस्थित होते.









