सरस्वती पाटील यांचे प्रतिपादन : देसूर येथे आर. एम. चौगुले यांचा झंझावाती प्रचार : सीमाबांधवांची ताकद दाखवा
वार्ताहर /किणये
गेल्या 66 वर्षापासून सीमाप्रश्नाचा लढा आम्ही लोकशाही मार्गाने लढत आहोत. सरकार नेहमीच सीमाबांधवांवर अन्याय, अत्याचार करत आहे. मराठीची गळचेपी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या अन्यायाच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी तसेच मराठी भाषा आणि संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले यांना निवडून द्या, असे मनोगत सरस्वती पाटील यांनी देसूर येथे व्यक्त केले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे ग्रामीणचे उमेदवार आर. एम. चौगुले यांचा रविवारी देसूर गावात झंझावाती प्रचार करण्यात आला. यानंतर महिलांना मार्गदर्शन करताना सरस्वती पाटील बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, आपण अन्याय सहन करायचा तरी किती. आपली लोकेच्छा आता या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून देण्याची गरज आहे. त्यासाठी आपले बहुमोल मत समितीचे आर. एम. चौगुले यांना द्या, असेही त्या म्हणाल्या. अजित देशपांडे, शुभम शेळके यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करून सीमाप्रश्नाच्या लढ्याबद्दल माहिती सांगितली. आणि समितीच्या उमेदवारांना निवडून देऊन सीमाबांधवांची ताकद दाखविण्याची हीच वेळ आहे, असे सांगितले. यावेळी समितीचे नेते तसेच देसूर गावातील समितीचे कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गावात आर. एम. चौगुले यांची प्रचारफेरी काढण्यात आली. यावेळी डोक्यावर घागर घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या.









