महाराष्ट्राचे युवा नेते रोहित पाटील यांचे सीमा बांधवांना आवाहन : बेळगुंदी येथे आर. एम. चौगुले यांची प्रचारसभा

वार्ताहर /किणये
भारत देश 1947 साली स्वतंत्र झाला. पण बेळगाव आणि बेळगावचा ग्रामीण भाग मात्र अजूनही पारतंत्र्यातच आहे, असे म्हणण्याची वेळ आमच्यावर आली आहे. कारण गेल्या 66 वर्षांपासून सीमाप्रश्नाचा लढा सुरू आहे. मराठी भाषिकांवर सातत्याने अन्याय, अत्याचार केला जातो. या अन्यायाला कुठेतरी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला तरी पुन्हा कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल करते. आता सीमाबांधवांनी गप्प बसून चालणार नाही. यासाठी अन्यायाने पेटून उठले पाहिजे. विधानसभेत आपल्या हक्काचा माणूस पाठविला पाहिजे. सीमाप्रश्नाच्या लढ्यासाठी समितीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन महाराष्ट्राचे युवा नेते रोहित आर. पाटील यांनी बेळगुंदी येथे केले. म. ए. समितीचे ग्रामीणचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांची भव्य प्रचारसभा सोमवारी रात्री बेळगुंदी येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेला महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील सीमाबांधवांना मार्गदर्शन करत होते. रोहित पाटील पुढे म्हणाले, या भागात मराठी अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी म. ए. समितीच्या माध्यमातून अनेकांनी त्याग केला आहे. सीमाप्रश्नाच्या लढ्यासाठी काही जणांनी बलिदान दिले आहे. त्या सर्वांचे बलिदान आणि त्याग लक्षात ठेवून सर्वांनी समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले यांना निवडून दिले पाहिजे.
कुटिल डाव हाणून पाडा
या भागात मराठी शाळांची संख्या कमी होत आहे. इंग्रजी आणि कन्नड शाळांना अधिक अनुदान देण्यात येते. येणाऱ्या काळात मराठीची कशी गळचेपी करता येईल याचा विचारच इथले सरकार करत आहे. त्यामुळे मराठी भाषा टिकवून ठेवण्यासाठी सीमाबांधवांनी प्रयत्न केले पाहिजेत. एकीची वज्रमूठ दाखवून येणाऱ्या काळात सीमाबांधवांची ताकद प्रशासनाला दाखवून देण्याची गरज निर्माण झाली आहे. या बेळगावमध्ये रिंगरोडच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याचा प्रयत्न केला जातोय. शेतकऱ्यांच्या जमिनी दडपशाही मार्गाने घ्यायच्या आणि त्याला कवडीमोल दर द्यायचा, असा डाव इथल्या सरकारने चालविला आहे. त्यांचा हा डाव ओळखून तो पूर्णपणे हाणून पाडला पाहिजे. यासाठी तुमच्या हक्काचा आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीची जाणीव असणारे उमेदवार आर. एम. चौगुले आहेत.
एकजुटीने मतदान करा
बेळगुंदीच्या या सभेत शेकडो कार्यकर्ते उपस्थित आहेत. या सर्व कार्यकर्त्यांनी आणि महिलांनी ताकद दाखविली तर विधानसभेत ग्रामीणचा भगवा नक्कीच फडकणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने ग्रामीणच्या चौगुले यांना मतदान करा, असे आवाहन रोहित पाटील यांनी केले. प्रारंभी बेळगुंदीच्या वेशीत रोहित आर. पाटील यांचे पुष्पवृष्टी करून जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर ही प्रचारफेरी गावातील हुतात्मा स्मारकात आली.
घोषणांनी परिसर दणाणला
यावेळी कार्यकर्त्यांनी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा दिल्या. या घोषणांनी अवघा परिसर दणाणून गेला होता. 6 जून 1986 साली कन्नड सक्तीविरोधी आंदोलनात बेळगुंदी गावातील मारुती गावडा, भावकू चव्हाण, कल्लाप्पा उचगावकर या तिघांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. या हुतात्म्यांच्या स्मारकाचे पूजन रोहित पाटील यांनी करून हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी अमर रहे अमर रहे, हुतात्मा अमर रहे, अशा घोषणा देण्यात आल्या. सभेच्या अध्यक्षस्थानी समितीचे एकनिष्ठ कार्यकर्ते व उद्योजक रामचंद्र पाटील होते. प्रास्ताविक मनोहर किणेकर यांनी केले. शिवाजी सुंठकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर एम. जी. पाटील, प्रकाश मरगाळे, उमेदवार आर. एम. चौगुले व हुतात्मांचे वारसदार शट्टूप्पा चव्हाण, धुळोबा गावडा, जोतिबा उचगावकर उपस्थित होते. सूत्रसंचालन किरण मोटर यांनी केले. यावेळी राजू किणेकर, मारुती शिंदे, महेश पावसकर, पुंडलिक सुतार, ईश्वर पाटील, शिवाजी चिरमुरकर, रामा आमरोळकर, अरुण जाधव, नागेश पाटील, सनील झंगरूचे, संभाजी बागीलगेकर आदींसह पश्चिम भागातील कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.









