उमेदवार प्रियांका जारकीहोळी : कुडची मतदारसंघात प्रचार
बेळगाव : चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या संपूर्ण विकासाला काँग्रेसच पर्याय आहे. यासाठी काँग्रेस पक्षाला मतदान करून पाठबळ द्यावे, असे आवाहन चिकोडी लोकसभा काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी केले. रायबाग तालुक्यातील कुडची विधानसभा मतदारसंघात कुडचीसह अलकनूर जिल्हा पंचायत व्याप्तीमध्ये आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सभेमध्ये त्या बोलत होत्या. चिकोडी लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करणे हे आपले ध्येय आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत कुडची मतदारसंघातील मतदारांनी काँग्रेस पक्षाला समर्थन दिले आहे. त्या प्रमाणेच या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून आपण निवडणूक लढवत आहे. आपणाला सर्वाधिक मतदान देऊन विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले. समाजातील सर्व स्तरातील सर्व घटकांचा विकास हे आपले उद्दिष्ट आहे. काँग्रेस पक्षाकडून नेहमीच सर्वांगिण विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे.
गॅरंटी योजनांच्या माध्यमातून गोरगरिबांचे कल्याण साधले आहे. यासाठी पक्षाला अधिक बळकट करण्यास मतदान करून समर्थन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. अनेक वर्षांपासून बेळगाव जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये आपण सक्रियपणे सहभाग घेऊन कार्य करत आहे. सतीश जारकीहोळी फौंडेशनच्या माध्यमातून समाजसेवा केली जात असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन अनेकांना रोजगार उपलब्ध करून देण्यावर कार्य केले जात आहे. ही सेवा यापुढेही कायम राहणार आहे. त्यामुळे मतदारांनी काँग्रेस पक्षाला मतदान करून पाठबळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उमेदवार प्रियांका यांचे पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत करण्यात आले. मतदारांकडून मिळणारा प्रतिसादही मोठ्या प्रमाणात होता. यावेळी समाजातील पक्षाचे नेते, कार्यकर्ते, महिला संघटना, युवा संघटना आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









