न्यूझीलंडला 40 धावांची आघाडी, हेन्रीचे सात बळी
वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत येथे सुरू असलेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात शनिवारी खेळाच्या दिवसाअखेर यजमान न्यूझीलंडने 40 धावांची आघाडी मिळवली. विल्यम्सनने आपल्या शतकी कसोटीत 34 वे अर्धशतक झळकवले. तत्पुर्वी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात न्यूझीलंडवर 94 धावांची आघाडी मिळवली. न्यूझीलंडच्या हेन्रीने 67 धावात 7 गडी बाद केले.
या मालिकेतील पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकून न्यूझीलंडवर आघाडी घेतली आहे. या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडचा पहिला डाव 162 धावांत आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलियाने 4 बाद 124 या धावसंख्येवरून खेळाला सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाच्या लाबुशेनने 147 चेंडूत 12 चौकारांसह 90 धावा झळकवल्या. नाईट वॉचमन लियॉनने 3 चौकारांसह 20 धावा जमवल्या. लियॉन आणि लाबुशेन यांनी पाचव्या गड्यासाठी 51 धावांची भागीदारी केली. मिचेल मार्शला खाते उघडता आले नाही. कॅरेने 2 चौकारांसह 14 धावा जमवल्या. स्टार्कने 3 चौकारांसह 28 तर कर्णधार कमिन्सने 22 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह 23 धावा केल्या. लाबुशेन आठव्या गड्याच्या रुपात बाद झाला. ऑस्ट्रेलियाचा पहिला 68 षटकात 256 धावात आटोपला. ऑस्ट्रेलियाच्या सहा फलंदाजांनी 132 धावांची भर घातली. न्यूझीलंडतर्फे मॅट हेन्रीने 67 धावात 7 तर साऊदी, सिरेस आणि फिलिप्स यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
94 धावांनी पिछाडीवर असलेल्या न्यूझीलंडने दुसऱ्या डावाला सुरुवात केली पण स्टार्कने सलामीच्या यंगला एका धावेवर झेलबाद केले. त्यानंतर लॅथम आणि विल्यम्सन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 105 धावांची भागीदारी केली. विल्यम्सनची ही 100 वी कसोटी असून त्याने आपले 34 वे अर्धशतक 105 चेंडूत झळकवले. लॅथमने 154 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 65 धावा जमवल्या. कमिन्सने विल्यम्सनचा त्रिफळा उडवला. त्याने 107 चेंडूत 6 चौकारांसह 51 धावा जमवल्या. रचिन रविंद्र 11 धावावर खेळत आहे. न्यूझीलंडने 40 धावांची आघाडी घेतली असून त्यांचे आठ गडी खेळावयाचे आहेत. या कसोटीतील खेळाचे तीन दिवस बाकी असल्याने ही लढत रंगतदार अपेक्षीत आहे. लॅथमला यष्टीरक्षक कॅरेकडून जीवदान मिळाले. ऑस्ट्रेलियातर्फे स्टार्क आणि कमिन्स यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड प. डाव 45.2 षटकात सर्वबाद 152, ऑस्ट्रेलिया प. डाव 68 षटकात सर्वबाद 256 (लाबुशेन 90, ग्रीन 25, हेड 21, लियॉन 20, स्टार्क 28, कमिन्स 23, हेन्री 7-67, साऊदी, सिरेस, फिलिप्स प्रत्येक एक बळी), न्यूझीलंड दु. डाव 50 षटकात 2 बाद 134 (लॅथम खेळत आहे 65, रचिन रविंद्र खेळत आहे 11, विल्यम्सन 51, यंग 1, स्टार्क 1-39, कमिन्स 1-21).









