वृत्तसंस्था/ ऑकलंड
आयपीएल स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झालेला न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विल्यम्सन आता फिट होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच नेट्समध्ये सराव करत असलेला विल्यम्सन आता थेट न्यूझीलंड संघाच्या कॅम्पमध्ये दाखल झाला असून, संघासोबत सराव करत आहे. न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने विल्यम्सनच्या सरावाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
केन विल्यम्सनने दुखापतीतून पुनरागमन करत फलंदाजीचा सराव सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी विल्यम्सनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो फलंदाजी करताना दिसत आहे. खास बाब अशी की, विलियम्सन या व्हिडिओत पूर्णपणे फिट असल्याचे दिसत आहे आणि तो त्याचे सर्व क्रिकेट शॉट्स मारत आहे. यामुळे त्याच्या विश्वचषकात खेळण्याच्या आशा आणखीच वाढल्या आहेत. यादरम्यान त्याने पुन्हा संघाशी जोडून आणि काही नवे चेहरे पाहून आनंद झाल्याचे म्हटले. या व्हिडिओमध्ये तो कशाप्रकारे पुनरागमनासाठी मेहनत घेत होता हे देखील दिसून येत आहे.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत विल्यम्सन गुजरात टायटन्स संघाचा भाग होता. हंगामाच्या सुरुवातीच्या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना विल्यम्सनला गुडघ्याची दुखापत झाली होती. त्याच्या उजव्या गुडघ्याचे ऑपरेशनही करावे लागले होते. त्यानंतर त्याच्या विश्वचषकात खेळण्याच्या आशा कमी झाल्या होत्या. मात्र, ज्याप्रकारे त्याने रिकव्हरी केली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वचषक स्पर्धेत खेळण्याच्या आशा वाढल्या आहेत.









