ओमान सरकारशी चर्चा सुरु, यश येण्याची शक्यता
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतातून पळून गेलेला इस्लामी प्रचारक झाकीर नाईक याचा भारताला ताबा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तो ओमानमध्ये येणार असून ओमान सरकार त्याचे प्रत्यार्पण करण्यास तयार आहे, असे वृत्त आहे. भारत सरकारची या संदर्भात ओमान प्रशासनाशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे.
23 मार्चला तो ओमानमध्ये येणार आहे. तेथे त्याला एका संस्थेने दोन व्याख्याने देण्यासाठी आमंत्रित केले आहे. 23 मार्चपासून रमझानचा महेना सुरु होत आहे. त्या निमित्ताने त्याचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ओमानमध्ये त्याला ताब्यात घेण्याच्या दृष्टीने भारताची पावले पडत असून ओमान सरकारने यासाठी सहकार्य करावे, असे प्रयत्न सुरु आहेत. ओमानमधील भारतीय दूतावासाने तेथील प्रशासनाशी संपर्क केला असून या प्रयत्नांना यश येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्याला पकडणे शक्य झाल्यास पुढची कारवाई करण्यासाठी भारतातील विधीतज्ञांचे एक दल पाठविण्याची तयारीही भारताने ठेवली आहे.
राजदूतांशी संपर्क
भारताच्या परराष्ट्र विभागाने यासंबंधी ओमान येथील भारतीय राजदूतांना काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत. ओमानच्या स्थानिक कायद्यांचे साहाय्य घेऊन नाईक याला कसे ताब्यात घेता येईल, यावर विचार करण्यात आला आहे. ओमानच्या भारतातील राजदूतांनाही या संदर्भात विश्वासात घेण्यात आले आहे. अर्थात. ओमाने सहकार्य केल्यासच या प्रयत्नांना यश मिळणार आहे.
नाईकवरचे आरोप
झाकीर नाईक याच्यावर मनी लाँडरिंग आणि धार्मिकदृष्टय़ा प्रक्षोभक भाषणे देणे, तसेच धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करणे असे आरोप आहेत. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर तो देशाबाहेर पळून गेला होता. त्याने स्थापन केलेल्या इस्लामिक रीर्सच फाऊंडेशन या संस्थेवर भारताने 2016 मध्ये बंदी घातली होती. या संस्थेवरही धर्मांधता वाढविणे, दोन समाजांमध्ये फूट पाडणे, धार्मिक उन्माद वाढवून प्रक्षोभ निर्माण करणे , अशा कृत्यांना साहाय्य कारणे, असे आरोप ठेवण्यात आले आहेत. मार्च 2022 मध्येही ही संस्था केंद्रीय गृहविभागाकडून बेकायदेशीर असल्याचे घोषित करण्यात आले होते.
पीस टीव्हीचा संस्थापक
इस्लाम धर्माचा प्रसार करण्यासाठी नाईक याने पीस टीव्हीची स्थापना केली होती. या टीव्ही चॅनेलवरही आता बंदी घालण्यात आली आहे. या चॅनेलवरुनही नाईक याच्या विचारसरणीचा प्रचार केला जात होता. या वाहिनीसंबंधात अनेक तक्रारी असूनही मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वातील सरकारने दुर्लक्ष केले होते.
मलेशियाला पलायन
झाकीर नाईकने 2017 मध्ये भारतातून पळून जाऊन मलेशियात आश्रय घेतला होता. त्याचे तेथून प्रत्यार्पण व्हावे यासाठी भारताने बरेच प्रयत्न केले होते. तथापि, मलेशिया सरकारने त्याला राजाश्रय दिला होता. मात्र, तेव्हापासून त्याच्या प्रक्षोभक कृत्यांना काहीसा आळा बसला आहे. सध्या तो फारसा प्रकाशात नसतो.









