जिल्हाधिकाऱ्यांचे मुचंडी, मुत्त्यानहट्टी येथील महिलांना तोडगा काढण्याचे आश्वासन
बेळगाव : नागरिक आपले कुटुंबीय व विविध कामांसाठी कर्जाच्या माध्यमातून मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून पैसे घेतात. कंपन्यांकडून व्याजदर आकारून कर्जस्वरुपात रक्कम देण्यात येते. परतफेडीसाठी कर्जदारांना हप्त्याची सुविधा देण्यात येते. मात्र हप्ते चुकविल्यास मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिक तथा महिलांचा अपमान व छळ करण्यात येतो. असाच प्रकार मुचंडी व मुत्त्यानहट्टी येथील महिलांबरोबर झाल्याचे समजते. याबाबत तक्रार करण्यासाठी मोठ्या संख्येने महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.
जिल्हाधिकाऱ्यांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांबरोबर थकीत हप्ते भरण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यासाठी पत्रव्यवहार करण्याचे आश्वासन दिले. प्रारंभी महिलांनी उत्तरचे आमदार असिफ सेठ यांची भेट घेऊन आपली कैफीयत त्यांच्यासमोर मांडली. यावेळी आमदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येण्याचे आवाहन करत जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यानंतर सदर महिला जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी महिलांना सभाभवनात बोलावून बैठक घेतली. याप्रसंगी महिलांनी आपल्या समस्या मांडून यावर निवारण करण्याची मागणी केली.
कुटुंबीयांशी हुज्जत
महिलांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांकडून कर्जफेडीसाठी तगादा लावण्यात येत आहे. प्रसंगी कर्मचारी घराकडे येऊन कुटुंबीयांशी हुज्जत घालून अपमानीत करत आहेत. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासामुळे मानसिक खच्चीकरण होत आहे. आम्ही कर्जफेडीसाठी मुदत देण्याची विनंती कर्मचाऱ्यांकडे केली होती. मात्र त्यांच्याकडून ती धुडकावण्यात आली असून त्यांच्याकडून त्रास सुरुच आहे. यासाठी आम्हाला दिलासा देण्याची मागणी महिलांकडून करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी त्रास देणाऱ्या कंपन्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याची सूचना केली. तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांना थकीत हप्ते भरण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच महिलांनीही घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेत पूर्ण करण्याचेही आवाहन केले. त्याचबरोबर सायबर पोलिसांना संबंधित कंपन्यांविरोधात एफआयआर दाखल करून घेऊन याचा संपूर्ण अहवाल तीन महिन्यात सादर करण्याची सूचना दिली. तीन महिन्यानंतर पुन्हा बैठकीचे आयोजन करून यावर तोडगा काढण्याचे आश्वासनही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी आमदार असिफ सेठ यांनीही विविध सूचना दिल्या.









