अध्यक्ष विनोद शिरोडकर यांची माहिती : बिनबुडाचे आरोप सोसून पदावर राहणार नाही
मडगाव : मडगाव न्यू मार्केट ट्रेडर्स असोसिएशन नवीन समिती निवडून त्यात युवकांना जास्त संधी दिली जाईल व आपण आणि अन्य ज्येष्ठ सदस्य समितीत सल्लागार म्हणून राहतील, अशी माहिती या संघटनेचे अध्यक्ष विनोद शिरोडकर यांनी दिली. रविवारी विनोद शिरोडकर यांनी संघटनेची नव्हे, तर आपल्यावर काही जण करत असलेल्या आरोपांमुळे सदस्यांची बैठक बोलाविली होती. त्यास 265 सदस्यांनी उपस्थिती लावली. आपल्यावर आरोप करणाऱ्यांपैकी काही जण या बैठकीला न जाण्यास सदस्यांना सांगत होते. तरीही बहुतेक सदस्यांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, असे शिरोडकर यांनी सांगितले.
स्वत:हून अध्यक्षपद सोडणार असल्याचे मी बोलून दाखविले तेव्हा बहुतेक सदस्यांनी मला तसे करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र उगाच बिनबुडाचे आरोप सोसून समितीच्या पदावर न राहता सल्लागार म्हणून सहकार्य करण्याचे आपण ठरविलेले आहे, असे शिरोडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आपण कित्येक वर्षे या संघटनेचे अध्यक्ष म्हणून धुरा वाहिली. नेहमीच बाजाराकरांच्या हिताचे निर्णय घेतले. सरकारने दुकानांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला असता न्यायालयाच्या पायऱ्या झिजवल्या, मंत्री-आमदारांना साकडे घातले. त्यात आमदार दिगंबर कामत, विजय सरदेसाई, तत्कालीन आमदार बाबू आजगावकर, माजी आमदार दामू नाईक यांनी सहकार्य केले, याकडे शिरोडकर यांनी लक्ष वेधले.
आमचे सदस्य जे वयस्कर झाले आहेत त्यांना दुकानावर येणे जमत नाही. त्यांनी भागीदारीने दुकाने चालवायला दिली आहेत. यात काही वावगे नाही. उदरनिर्वाहासाठी ते आवश्यक आहे, असे ते म्हणाले. तरीही पैसे घेतले जात असल्याचे जे आरोप होत आहेत त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. संघटनेच्या बँकेत कायम ठेवी आहेत. त्या तीन सदस्यांच्या वैयक्तिक नावावर आहेत. आपल्याकडे त्यांची सर्टिफिकेट्स आहेत, असे शिरोडकर यांनी स्पष्ट केले. कोविडमुळे मागील चार वर्षे संघटनेच्या निवडणुका घेणे शक्य झाले नाही. मात्र लवकरच आमसभा घेऊन सर्व सोपस्कार पूर्ण केले जातील, असे त्यांनी सांगितले.









