खानापूर : निवडणुकीत जय पराजय होतच राहणार. मी पराभवाने खचलेली नाही, ज्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केलेला आहे. त्यांचे धन्यवाद. तसेच खानापूर तालुक्याच्या विकासासाठी गेल्या पाच वर्षात प्रामाणिक प्रयत्न केले. आणि त्याची पूर्तताही केली आहे. यातच मला समाधान आहे. तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या सोयीसुविधासाठी माझा विचार वेगळा होता. त्या दृष्टीनेच मी प्रयत्न केले. शासनाने सापत्नभावाची वागणूक दिली. मात्र मी सातत्याने पाठपुरावा करत राहिले. दुर्गम भागातील गावांसाठी जे शक्य झाले नाही ते निश्चित माझ्या हातून झाले आहे. यात मला समाधान आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार आहे. तालुक्याच्या विकासासाठी शासनदरबारी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे, असे माजी आमदार निंबाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी केलेल्या कामांची माहिती दिली.
जामगाव गावाला गेल्या शेकडो वर्षापासून पूल नव्हता. मी गावकऱ्यांना शब्द दिला होता. त्यासाठी जामगाव नाल्यावर 60 लाख रुपये निधी मंजूर करून युद्धपातळीवर पुलाची निर्मिती केली. त्यामुळे जामगाव वासियांचा पावसाळ्यातील खानापूरशी संपर्क तुटत होता. ते आता कायम खानापूरशी जोडले गेले आहेत. शिरोली रस्ता, डोंगरगाव रस्ता, हेम्माडगा येथील सीसी रस्ता तसेच हेम्माडगा-सिंदनूर या राज्य मार्गासाठी 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला असून या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अशोकनगर-नेरसा रस्ता, मणतुर्गा क्रॉस ते मणतुर्गा, हारुरी ते ढोकेगाळी रस्ता, रुमेवाडी आणि डोंगरगावजवळील रस्त्यावर पुलाची निर्मितीसह अनेक विकासकामे केली आहेत. मात्र राजकारणात विकास गौण ठरला. आणि मी पराजीत झाले. मात्र या पुढेही खानापूरच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. यात शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्र तसेच तालुक्यातील सर्वसामान्यांच्या अडीअडचणीसाठी मी सतत प्रयत्नशील राहणार आहे. राजकारण हे फक्त निवडणुकीपुरते असते. मात्र तालुक्यातील जनतेशी जुळलेली नाळ मी कधीही तोडणार नाही. यासाठी मी पुन्हा लोकसेवा हेच ध्येय उराशी बाळगूण कार्यरत राहणार आहे. जनतेला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी जे शासनदरबारी करता येईल, ते मी माझ्यापरीने करणार आहे. काँग्रेस सत्तेवर असल्याने मला लोकांच्या सेवेची एकप्रकारे संधीच मिळालेली आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या गरँटीही सरकारने लागू केल्या आहेत. त्याची तालुक्यात योग्य पद्धतीने अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. असे त्यांनी बोलताना सांगितले.









