भारतातील अमेरिकेच्या आगामी राजदूतांचा दावा : रशियन तेल खरेदी भारताने थांबवावी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे क्वाड देशांच्या प्रमुखांच्या आगामी बैठकीसाठी भारताचा दौरा करू शकतात. भारतातील अमेरिकेचे राजदूत म्हणून नामनिर्देशित सर्जियो गोर यांनी अमेरिकेच्या सिनेटमध्ये ही माहिती दिली आहे. तसेच गोर यांनी क्वाडबद्दल अमेरिकेच्या प्रतिबद्धतेचा पुनरुच्चार केला. अमेरिका आणि भारत स्वत:च्या संबंधांमधील अडचणी दूर करण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत असे त्यांनी सांगितले आहे. तसेच त्यांनी रशियन कच्चे तेल खरेदी करणे भारताने थांबवावे, असे म्हटले आहे.
सिनेटमध्ये नियुक्तीला मंजुरी मिळण्यासाठीच्या सुनावणीदरम्यान गोर यांनी क्वाड समुहावरून विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले. सध्याचा काळ अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे म्हणत गोर यांनी अध्यक्ष ट्रम्प क्वाड देशांच्या प्रमुखांच्या बैठकीत सामील होण्यासाठी भारताचा दौरा करू शकतात, असे संकेत दिले. भारत यंदा क्वाड शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे. क्वाडसोबत बैठका जारी ठेवणे आणि या समुहाला मजबूत करण्यासाठी अमेरिका पूर्णपणे प्रतिबद्ध आहे. क्वाडच्या आगामी बैठकीसाठी ट्रम्प यांच्या दौऱ्यासंबंधी यापूर्वीच चर्चा झाली असल्याची माहिती गोर यांनी दिली.
भारत रणनीतिक भागीदार
सर्जियो गोर यांनी भारताला रणनीतिक भागीदार संबोधित भारताची भूमिका हिंद-प्रशांत क्षेत्राला आकार देणार असल्याचे नमूद केले. या महत्त्वपूर्ण भागीदारीत अमेरिकेच्या हितांना पुढे नेण्यासाठी मी प्रतिबद्ध आहे. अमेरिकेने पुढील आठवड्यात एका भारतीय शिष्टमंडळाला आमंत्रित केले असून दोन्ही देश एका कराराच्या समीप असल्याचा खुलासा गोर यांनी केला.
ब्रिक्समधील अमेरिकेचा सहकारी
भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे बंद करावे, असे अध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. भारत हा ब्रिक्स समुहातील अमेरिकेचा सहकारी आहे. ब्रिक्समध्ये विविध मुद्द्यांवर भारत आमचा समर्थक राहिला आहे. ब्रिक्सचे अनेक देश कित्येक वर्षांपासून अमेरिकेच्या डॉलरपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहेत, भारत यात एक अस्थायी उपाय राहिला असल्याचे गोर यांनी म्हटले आहे.
भारतासोबत तुलनेत मधूर संबंध
ब्रिक्सच्या काही अन्य सदस्य देशांच्या तुलनेत भारत आमच्यासोबत जोडला जाण्यासाठी अधिक इच्छुक आणि खुला आहे. भारताचे चीनच्या तुलनेत अमेरिकेसोबत अधिक मधूर संबंध आहेत. भारत आमच्या बाजूने येईल आणि चीनपासून दूर जाईल, अशी अपेक्षा असल्याचे उद्गार गोर यांनी काढले आहेत.









