138 कामगारांचे प्रकरण मनपाच्या अधिकाऱ्यांना शेकणार : कंत्राटदारांतून तीव्र नाराजी
बेळगाव : महापालिकेमध्ये नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये 138 कामगारांच्या नियुक्तीवरून मोठा गोंधळ उडाला होता. याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र यामुळे 138 सफाई कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचबरोबर त्यांना यापुढे कामावर नियमित रुजू करून घेणार का? हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. ही नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. तेव्हा आता त्या कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार हे निश्चित आहे.
महापालिकेमध्ये सफाई कर्मचारी असो किंवा इतर कोणत्याही कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना आहे. मात्र महापालिकेतील सध्या असलेल्या काही अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करत ही नियुक्ती केल्याचे दिसून येत आहे. यामध्ये काही नगरसेवकांचाही समावेश असल्याचा आरोप यापूर्वीही झाला आहे. नियुक्ती करताना त्या कर्मचाऱ्यांकडून मोठी रक्कम घेतल्याचाही आरोप होत आहे. त्यामुळे हे प्रकरण गंभीर बनले आहे. शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये या विषयावर जोरदार चर्चा झाली. महापौर शोभा सोमणाचे यांनी केवळ कामगार कमी असून भरतीसाठी पाऊल उचलावे, अशी मागणी केली होती. मात्र त्याचा गैरफायदा घेत बेकायदेशीररित्या थेट भरती करण्यात आली आहे. त्यामुळे इतर नगरसेवकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
सफाई कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. याचबरोबर चालकही कमी आहेत. त्यामुळे कामगारांची भरती करण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र चर्चा झाल्यानंतर तातडीने 138 कामगार नियुक्त करण्यात आले. ते नियुक्त करताना नियमांचे उल्लंघन केले आहे. तत्कालीन आयुक्त रुद्रेश घाळी यांनी आदेश दिल्याचे सांगण्यात आले. मात्र त्या आदेशामध्ये कामगार नियुक्तीबाबत कोणताच उल्लेख नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हा गैरप्रकार झाल्याचे सर्वसाधारण सभेमध्ये स्पष्ट झाले. दरम्यान नियुक्त केलेले कामगार कंत्राटदारांकडे सोपविण्यात आल्याचे या बैठकीमध्ये सांगण्यात आले. मात्र या सर्वसाधारण सभेपूर्वी सफाई कंत्राटदारांनी तक्रार देखील दाखल केली होती. नियुक्ती करण्यात आलेल्या कामगारांशी आमचा कोणताही संबंध नाही, त्यांचे वेतन आम्ही देऊ शकत नाही, असे निवेदन दिले होते. त्यानंतरदेखील त्या कंत्राटदारांवर वेतन देण्यासाठी दबाव घालण्यात आला आहे. यामुळे कंत्राटदारांतूनही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
अधिकाऱ्यांची चांगलीच कोंडी
महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांना आमदार राजू सेठ यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली. याचबरोबर चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करा, असेदेखील यावेळी सांगण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये सामील असलेल्या अधिकाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी नेमका कोणता निर्णय घेणार याकडे आता साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. एकूणच याप्रकरणामध्ये कामगारांची मात्र हेळसांड झाली आहे.









