एप्रिल महिन्यात दिली जाते 5 टक्के सवलत : निवडणुकीमुळे असंख्य मालमत्ताधारक सवलतीपासून वंचित
बेळगाव : एप्रिल महिन्यात घरपट्टी भरणाऱ्या मालमत्ताधारकांना 5 टक्के सवलत देण्यात येते. मात्र विधानसभा निवडणुकीमुळे महापालिका कार्यालयासह बेळगाव वन कार्यालयात कर भरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. घरपट्टी चलन मिळाले नसल्याने 5 टक्के सवलतीचा लाभ मालमत्ताधारकांना घेता आला नाही. त्यामुळे 5 टक्के सवलतीसाठी आणखी मुदत मिळणार का? अशी विचारणा नागरिक करीत आहेत. मागीलवेळी लोकसभा पोटनिवडणुकीमुळे मालमत्ताधारकांना 5 टक्के सवलतीचा लाभ घेता आला नाही. महापालिकेची यंत्रणा निवडणूक कामात व्यस्त असल्याने चलन घेण्यास अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे 5 टक्के सवलतीच्या मुदतीत एक महिन्याची वाढ करण्यात आली होती. मात्र यंदादेखील विधानसभा निवडणूक जाहीर झाल्याने मार्च महिन्यापासून महापालिका प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त होते. विशेषत: एप्रिल महिन्यात 5 टक्के कर सवलत देण्यात येते. मालमत्ता भरणाऱ्या नागरिकांना याचा लाभ होतो. हजारो मालमत्ताधारक एप्रिल महिन्यात घरपट्टी भरणा करून 5 टक्के सवलतीचा लाभ घेतात. मात्र एप्रिलच्या सुरुवातीपासूनच घरपट्टी भरण्यास अनेक अडचणींचा सामना मालमत्ताधारकांना करावा लागला.
तांत्रिक अडचणीचा मालमत्ताधारकांना फटका
1 एप्रिल रोजी घरपट्टी सवलतीची सुरुवात झाली. पण प्रारंभीच घरपट्टीच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने नागरिकांना चलन मिळाले नाही. त्यानंतर महापालिका कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी कार्यालयात उपलब्ध नसल्याने मालमत्ताधारकांना घरपट्टी चलन मिळू शकले नाही. त्यामुळे मालमत्ताधारकांना एप्रिल महिन्यात घरपट्टी भरण्यास अनेक अडचणींना तेंड द्यावे लागले. सध्या ऑनलाईनद्वारा घरपट्टी भरलेल्या तसेच चलन मिळविलेल्या मालमत्ताधारकांना 5 टक्के सवलतीचा फायदा घेता आला आहे. पण असंख्य मालमत्ताधारकांना याचा लाभ घेता न आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
5 टक्के सवलतीच्या मुदतीत वाढ करण्याची मागणी
लोकसभा पोटनिवडणुकीवेळी 5 टक्के सवलतीच्या मुदतीत वाढ करण्यात आली होती. त्याचप्रमाणे यंदादेखील 5 टक्के सवलतीच्या मुदतीत वाढ करण्यात येणार का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. शहरात 1 लाख 45 हजारहून अधिक मालमत्ताधारक असून काही मोजक्याच मालमत्ताधारकांनी आतापर्यंत घरपट्टी भरणा केली आहे. 25 हजारहून अधिक मालमत्ताधारक वेळेत घरपट्टी भरणा करून या सवलतीचा लाभ घेतात. त्यामुळे मालमत्ताधारकांच्या सुविधेसाठी आणि जास्तीत जास्त घरपट्टी जमा व्हावी, याकरिता महापालिकेने 5 टक्के सवलतीच्या मुदतीत वाढ करावी, अशी मागणी होत आहे.









