सातारा :
खासदार श्री. छ. उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रराजे हे दोघेही एकाच पक्षात असल्याने लोकसभा निवडणुकीवेळी मनोमिलन झाले. तेच विधानसभेलाही टिकले. परंतु नगरपालिका निवडणुकीत मनोमिलन पॅटर्न टिकेल काय?, कासच्या ओटीभरणाच्या कार्यक्रमाला फक्त सातारा विकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते होते. त्याचवेळी उदयनराजेंनीच पत्रकारांशी बोलताना मनोमिलनाचा निर्णय शिवेंद्रराजेंनी घ्यावा, असे स्पष्ट केल्याने मंत्री शिवेंद्रराजे व त्यांचे कार्यकर्ते हा प्रस्ताव स्विकारतील काय?, दोघांचे मनोमिलन झाले तर महाविकास आघाडीतून शशिकांत शिंदे यांच्यासोबत साताऱ्यातील कोण कोण असणार हे मात्र येत्या काही दिवसात पहायला मिळणार आहे.
पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या जर तरच्याच चर्चा साताऱ्यात सुरु आहेत. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीचा मागचा इतिहास पाहता खासदार उदयनराजे यांनी सर्वसामान्य घरातील महिला म्हणून डॉ. संजोग कदम यांच्या सौभाग्यवती माधवी कदम यांनी तिकीट सातारा विकास आघाडीचे देवून नगराध्यक्ष केले. त्यांच्या विरोधात नगरविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून दस्तुरखुद्द वेदांतिकाराजे या होत्या. भाजपा व इतर पक्षांचे उमेदवार सुद्धा त्या निवडणुकीत नशीब आजमावत होते. परंतु दोन्ही आघाड्या एकमेकांच्या विरोधात रिंगणात त्यावेळी असल्याने इतर पक्षांच्या उमेदवारांना यश आले नाही. सातारा विकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज भरतानाच पालिकेत पत्रकारांशी बोलताना उदयनराजेंनी सर्वसामान्य घरातील नगराध्यक्ष करणार असे जाहीर केले होते. त्यानंतर पाच वर्षाच्या कार्यकाळात कामकाज करताना नगराध्यक्ष माधवी कदम यांना राजकारण चांगलेच उमजू लागले होते. आता पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषगांने तब्बल सात वर्षानंतर चर्चा सुरु झाल्या आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये दोघे भाऊ एकत्र झाले. विधानसभेलाही एकत्रच राहिले. त्यांच्या सभेत माजी नगराध्यक्ष अशोक मोने हे परखडपणे बोलले होते की तुमच्यावेळी जादूकी झप्पी, पप्पी चालते आमच्यावेळेलाही तशीच असू द्या, त्यामुळे नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही भावांचे मनोमिलन राहणार काय याकडे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, नुकतेच कास धरणाच्या ओटी भरणाचा कार्यक्रम पार पडला. वास्तविक सातारा पालिकेत प्रशासक आहे. प्रशासक असताना सातारा विकास आघाडीचेच पदाधिकारी, कार्यकर्ते हे ओटी पूजनाच्या कार्यक्रमाला होते. नगरविकास आघाडीचे कोणीही या कार्यक्रमाला दिसत नव्हते. त्याच वेळी पत्रकारांनी उदयनराजेंना प्रश्न केल्यानंतर मनोमिलनाचा निर्णय शिवेंद्रराजेंनीच घ्यावा, स्थानिक पातळीवरचे राजकारण नसावे, असे परखडपणे मत व्यक्त केले होते. त्यामुळे एका बाजूने पुढे केलेला प्रस्ताव दुसऱ्या बाजूने मान्य होतो की अंतर्गत दोस्तीत कुस्तीचा कार्यक्रम होणार याच्या चर्चा सुरु आहेत.
दरम्यान, या दोन्ही भावांच्यात जर मनोमिलन झाले तर महाविकास आघाडीसाठी राष्ट्रवादी (श. प.) गटाचे शशिकांत शिंदे यांनी साखर पेरणी सुरुच ठेवली आहे. त्यांच्या गळाला या दोन्ही भावांचे कोण कोण कार्यकर्ते लागणार हे मात्र येत्या काही दिवसात पहाला मिळणार आहे. मागच्या निवडणुकीत भाजपाने दीपक पवारांच्या नेतृत्वाखाली चांगलाच प्रयत्न केला होता. आता ते दीपक पवारही राष्ट्रवादी शरद पवार गटात आहेत. शशिकांत शिंदेंच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा आहे. काँग्रेसची जी काय थोडीशी ताकद असेल, डाव्यांची ताकद असेल ती मिळून नगरपालिका निवडणुकीत भाजपा तथा दोन्ही भावांच्या विरोधात उभे ठाकण्यासाठी बैठका, रणनिती सुरु असून महाविकास आघाडीत शशिकांत शिंदे यांना कोण कोण शहरातील साथ देणार हे येत्या काही दिवसात पहायला मिळणार आहे.








