सीपीएड मैदानाशेजारी पाण्याचा अपव्यय : हजारो लिटर पाणी वाया
बेळगाव : शहरात कुठे ना कुठे पाणी गळती सुरू आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. याबाबत पाणीपुरवठा मंडळ मात्र उदासिन असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शहरातील पाणी गळती कधी थांबणार? असा प्रश्नही सर्वसामान्यांना पडू लागला आहे. शनिवारी सीपीएड मैदानाजवळ जलवाहिनीला गळती लागून हजारो लीटर पाणी वाया जाण्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. याबाबत स्थानिक नागरिकांतून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात शहरात पाणी समस्या गंभीर बनली होती. तब्बल पंधरा ते वीस दिवसाआड पाण्याचा पुरवठा होत होता. तर मनपाने 25 टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला होता. तर काही नागरिकांनी टँकरद्वारे पाणी विकत घेतले होते. शिवाय सद्य परिस्थितीत काही भागात अद्यापही पाणी समस्या आहे. मात्र दुसरीकडे जलवाहिनी, व्हॉल्व्ह, जलकुंभांना गळती लागून पाण्याचा अपव्यय सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्यात तरी गळती थांबणार का? असा प्रश्न पडू लागला आहे.
निम्म्या भागात अद्यापही पाच-सहा दिवसाआड पाणी
शहरात विकासकामांना गती देण्यात आली आहे. दरम्यान गटारी, ड्रेनेज आणि रस्त्यांसाठी खोदाई करण्यात आली आहे. या खोदाई दरम्यान जलवाहिन्यांना गळती लागण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरात ठिकठिकाणी लहान आणि मोठ्याप्रमाणात गळती लागून पाणी वाया जाऊ लागले आहे. अद्यापही शहरातील निम्म्या भागात पाच सहा दिवसाआड पाणी पुरवठा होऊ लागला आहे. तर पाणी गळतीही सुरुच आहे. त्यामुळे पाणीपुरवठा आणि एलअँडटी कंपनीच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.









