माणसी 10 किलो धान्य वाटप करण्याची रेशनदुकानदारांची मागणी
बेळगाव : केंद्र सरकारने रेशन तांदळाच्या दरात कपात केली आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, राज्य सरकार हा तांदूळ खरेदी करून बीपीएल कार्डधारकांना वितरित करणार का? हेच आता पाहावे लागणार आहे. राज्य सरकारने निवडणुकीदरम्यान 10 किलो तांदूळ वाटप करण्याची घोषणा केली होती. दरम्यान, केंद्र सरकारने राज्य सरकारला तांदूळ देण्यास असमर्थता दर्शविली होती. त्यामुळे राज्य सरकारने नाईलाजास्तव तांदळाऐवजी प्रति किलो 34 रुपये प्रमाणे पैसे देऊ केले होते. आता केंद्र सरकारने रेशनच्या तांदळात मोठी कपात केली आहे. वाहतूक खर्चासह प्रति किलो 22.50 रुपये दराने तांदळाचा पुरवठा केला जात आहे. रेशन दुकानदार संघटनेने राज्य सरकारने माणसी 10 किलो तांदळाचा पुरवठा करावा, अशी मागणी लावून धरली आहे. शिवाय अन्न व नागरी पुरवठा मंत्री मुनियप्पा यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
राज्य सरकारने तांदूळ खरेदी करावा
राज्य सरकारने केंद्राकडून रेशन खरेदी केल्यास राज्य सरकारचे वार्षिक 2280 कोटी रुपयांची बचत होणार आहे, असे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केले आहे. सद्यस्थितीत अन्नभाग्य योजनेंर्गत माणसी 5 किलो धान्य आणि प्रति किलो 34 रुपये प्रमाणे निधी दिला जात आहे. मात्र केंद्र सरकारने रेशन तांदळाच्या किमती कमी केल्याने राज्य सरकारने हा तांदूळ खरेदी करावा, अशी मागणी होत आहे.
राज्य सरकारची मासिक 190 कोटीची बचत
केंद्र सरकारकडून बीपीएल कार्डधारकांना दरमहा माणसी 5 किलो तांदळाचा पुरवठा केला जात आहे. शिवाय राज्य सरकारकडून तांदळाऐवजी रक्कम दिली जात आहे. निधीऐवजी केंद्राकडून मिळणारा तांदूळ खरेदी केल्यास राज्य सरकारची मासिक 190 कोटी रुपयांची बचत होणार आहे. त्यामुळे सरकारने केंद्राकडून तांदूळ खरेदी करून वाटप करावे, अशी अपेक्षा रेशनदुकानदारांनी ठेवली आहे.









