उच्च न्यायालयात याचिका ः वर्षानुवर्षे बंद असलेल्या 20 खोल्या उघडून चौकशी करण्याची मागणी
लखनौ / वृत्तसंस्था
जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या आग्रा येथील ताजमहालमधील बऱयाच वर्षापासून बंदावस्थेत असलेल्या 20 खोल्या उघडण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला (एएसआय) निर्देश देण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. यासंबंधी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. भाजपचे अयोध्या जिल्हा मीडिया प्रभारी डॉ. रजनीश सिंह यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर मंगळवारी 10 मे रोजी सुनावणी होणार आहे.
ताजमहालमधील बंदावस्थेतील संबंधित खोल्या उघडल्यास त्यात हिंदू शिल्पे आणि शिलालेख आहेत की नाही हे समज शकेल, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. तसेच वस्तुस्थिती शोध समिती स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली. ताजमहालचे वर्णन ‘तेजो महालय’ असे करून याचिकेत सरकारला तथ्य शोध समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. ताजमहाल संकुलाचे सर्वेक्षण केल्यास शिवमंदिर आणि ताजमहालच्या अस्तित्वाची वास्तविकता तपासता येईल, असेही त्यात म्हटले आहे.
बंद खोल्यांमध्ये शिवमंदिर ?
ताजमहालच्या चारमजली इमारतीच्या वरच्या आणि खालच्या भागात 20 खोल्या आहेत, त्या कायमस्वरूपी बंद आहेत. त्या खोल्यांमध्ये शिवाचे मंदिर असल्याचे पी. एन. ओक यांच्यासह अनेक इतिहासकार मानतात. मात्र, या खोल्या यापूर्वी कधी उघडल्या आहेत की नाही याबाबत सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही. याचिकेत काही इतिहासकारांचाही हवाला देत रहस्य उलगडण्याची मागणी करण्यात आली आहे.
जगतगुरु परमहंसाचार्य शिवपूजेवर ठाम
ताजमहाल हा ‘तेजोमहाल’ असल्याचा दावा हिंदूत्ववादी संघटना अनेक दिवसांपासून करत आहेत. सावन येथील ताजमहाल येथे शिव आरती करण्याचा प्रयत्नही अनेक हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आला आहे. अलीकडेच जगतगुरु परमहंसाचार्य यांनीही ताजमहाल ‘तेजोमहाल’ असल्याचा दावा करत आतून शिवाची पूजा करण्याचा आग्रह धरला होता. त्यांच्या प्रवेशावरूनही बराच वाद झाला होता. पोलिसांनी त्यांना ताजमहालमध्ये जाण्यापासून रोखले होते.









