तिसरे उड्डाणपूल, फूट ओव्हरब्रिजचे काम अर्धवट स्थितीत
बेळगाव : अनगोळ येथील चौथे रेल्वेगेट व खानापूर येथील रोड अंडरब्रिजच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा सोमवार दि. 15 रोजी बेळगावमध्ये येत आहेत. रेल्वेमंत्री चौथे रेल्वेगेटचे भूमिपूजन करणार असले तरी त्यापूर्वी अर्धवट स्थितीत असलेल्या तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलाचे तसेच त्यावरील खड्ड्यांची पाहणी करणार काय? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. टिळकवाडी येथील दुसरे रेल्वेगेट उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू होईल, असे सांगण्यात आले होते. परंतु, हे काम रखडले आहे. तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलाचे उर्वरित काम मागील चार वर्षांपासून ठप्प आहे. पिलरसाठी घालण्यात आलेल्या लोखंडी सळ्या आता सडू लागल्या आहेत. तर उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण आहेत. अनेक आंदोलने झाली. परंतु, खड्ड्यांबाबत कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.
फूट ओव्हरब्रिजचे काम केव्हा होणार?
बेळगाव रेल्वेस्थानकाला स्मार्ट बवण्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्ची घालण्यात आले. परंतु, रेल्वेस्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी फूट ओव्हरब्रिज नसल्याने मागील वर्षभरापासून प्रवाशांची गैरसोय सुरू आहे. खुद्द खासदारांनी कंत्राटदाराला सुनावून देखील कासव गतीने काम सुरू ठेवण्यात आले आहे. त्यामुळे केंद्रीय रेल्वेमंत्री या समस्येकडे लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.









