15 हजार कोटींच्या मालमत्तेवर प्रश्न उपस्थित
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पतौडी कुटुंबाची 15 हजार कोटी रुपयांहून अधिकची मालमत्ता ‘शत्रूची मालमत्ता’ (एनिमी प्रॉपर्टी) म्हणून घोषित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान हा याच कुटुंबातील आहे. हे माजी संस्थनिकाचे कुटुंब आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात सैल अली खानने मध्यप्रदेश उच्च न्यायालयात दाद मागितली होती. तथापि, न्यायालयाने त्याला संबंधित लवाद अपील प्राधीकरणाकडे दाद मागण्याची सूचना केली आहे. त्यामुळे या मालमत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
केंद्र सरकारचा ‘शत्रू मालमत्ता कायदा’ नावाचा कायदा आहे. हा कायदा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तेव्हाच्या काँग्रेस सरकारने केला होता. तो आजही अस्तित्वात आहे. हा कायदा 1968 मध्ये, 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला होता. जे भारतातील नागरिक स्वातंत्र्य मिळण्याच्या वेळेला किंवा त्यानंतर पाकिस्तानात गेले, त्यांची मालमत्ता शत्रूची मालमत्ता म्हणून ताब्यात घेण्याचा अधिकार या कायद्यानुसार केंद्र सरकारला मिळाला आहे.
2014 पासूनचे प्रकरण
2014 मध्ये केंद्र सरकारने पतौडी कुटुंबाला या मालमत्तेसंबंधात नोटीस पाठविली होती. 2016 मध्ये केंद्र सरकारने अध्यादेश काढून अशा मालमत्तेवर वारसदारांना अधिकार सांगता येणार नाही, अशी व्यवस्था केली आहे. यामुळे पतौडी कुटुंबाची 15 हजार कोटी रुपयांची मालमत्ता आता या कुटुंबाजवळ राहणार का नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नंतर हे प्रकरण न्यायालयात गेले आहे.
13 डिसेंबरची सुनावणी
13 डिसेंबरला या प्रकरणी सुनावणी झाली. उपमहाधिवक्ता पुष्पेंद्र यादव यांनी न्यायालयाला महत्वाची माहिती दिली. या प्रकरणी अपेलेट लवादाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या संबंधीचा निर्णय नियमानुसार प्रथम अपेलेट लवादाला घेता येणार आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला. त्यानुसार उच्च न्यायालयाने बुधवारी सैफ अली खान याला लवादासमोर जाण्याचा आदेश दिला. पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर पतौडी कुटुंबातील एक महत्वाची व्यक्ती पाकिस्तानात गेल्याने ही मालमत्ता आता शत्रूची मालमत्ता झाली. त्यामुळे या कायद्यातील तरतुदींच्या अनुसार केंद्र वागणार आहे, असे मानण्यात येत आहे.
महत्वाचा घटनाक्रम
1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या वेळेला पतौडी घराण्याचे भोपाळ हे एक संस्थान होते. ते नंतर भारतात विलीन झाले. नबाब हमीदुल्लाखान हा या संस्थानाचा संस्थानिक होता. त्याला अबिदा सुलतान, साजीदा सुलतान आणि आणखी एक अशा तीन मुली होत्या. त्यांच्यापैकी अबिदा सुलतान हिने 1950 मध्ये पाकिस्तानात स्थलांतर केले. दुसरी मुलगी साजीदा हिने नबाब इफ्तीकार खान याच्याशी विवाह केला आणि ती भारतातच राहिली. तिने मालमत्तेवर वारसा अधिकार सांगितला. सैफ अली खान हा साजीदा सुलतान हिचा नातू आहे. त्याचा या मालमत्तेत एक वाटा आहे. तथापि, अबिदा सुलतानने पाकिस्तानात स्थलांतर केल्याने ही मालमत्ता कायद्याप्रमाणे शत्रूची मालमत्ता असल्याचे केंद्राचे म्हणणे आहे.
पुढे काय होणार?
पतौडी कुटुंबाच्या 15 हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेचे पुढे काय होणार, हे आता अपेलेट लवादाच्या निर्णयावर अवलंबून असेल. यासंबंधात एनिमी प्रॉपर्टी कायदा स्पष्ट असून पूर्वीच्या संस्थानिकांपैकी एक जरी पाकिस्तानात गेला असेल तर घराण्याची सर्व मालमत्ता शत्रूची मालमत्ता म्हणून घोषित करण्याचा आणि या मालमत्तेचा ताबा घेण्याचा केंद्र सरकारला अधिकार आहे, असा युक्तिवाद आहे. त्यामुळे येते काही महिन्यात या प्रकरणाला कशी दिशा मिळते ते दिसणार आहे.









