शहरातील जनतेचा प्रश्न : अनेक व्यावसायिक आस्थापनांचा कर मोठ्या प्रमाणात प्रलंबित
बेळगाव : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कर जमा करण्याबाबत उद्दिष्ट दिले जाते. महानगरपालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन घरपट्टी वसूल करत आहेत. मात्र शहरातील अनेक व्यावसायिक आस्थापनांचा कर मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे. काही प्रकरणे न्यायालयामध्ये आहेत. त्या आस्थापनांचा कर आणि भाडे वसुली कशी करणार? तसेच इतके दिवस त्यांना मुभा का देण्यात आली आहे? असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेतून होत आहे. कर जमा केले नाही तर संबंधितांकडून अधिक दंड वसूल केला जातो. मात्र काही जणांना त्यामधून मुभा दिली जात आहे, असा आरोप बैठकीमध्ये खुद्द नगरसेवकांनीच केला होता. आता तोच आरोप जनतेतूनही होत आहे. शहरातील अनेक आस्थापनांच्या मालकांनी कर भरण्याकडे दुर्लक्ष केले आहे. काही जणांचा 10 ते 15 वर्षांपासून कर भरला गेला नाही. त्यामुळे महानगरपालिकेला मोठा फटका बसला आहे. महत्त्वाचे म्हणजे एकाचवेळी कर भरतो असे त्यांच्याकडून सांगितले जाते. त्यानंतर काही जणांकडून कर घेताना त्यांना सूट दिली जाते. राजकीय दबाव तसेच काही एजंटांकडून अधिकाऱ्यांना सांगून मोठ्या करामध्ये सूट मिळविण्याचा प्रयत्न यापूर्वी झाला आहे. आणि संबंधितांना सूटदेखील देण्यात आली आहे, अशी अनेक प्रकरणे घडल्याचे नगरसेवकांनीच बैठकीत सांगितले. त्यामुळे त्यांच्याकडे प्रलंबित कर आहेत ते तातडीने वसूल करावेत, अशी मागणी होत आहे.
महापालिकेच्या अनेक आस्थापनांचे भाडे प्रलंबित
शहराच्या मोक्याच्या ठिकाणी महापालिकेची जागा आहे. याचबरोबर मोठ्या इमारती आणि गाळेही आहेत. काही ठिकाणी पेट्रोल पंपसाठी भाड्याने जागा दिली आहे. तर काही आस्थापनांमध्ये व्यवसाय करण्यासाठी गाळे देण्यात आले आहेत. मात्र अनेकांनी महापालिकेला भाडेच भरलेले नाही. तर काही जणांचे कोट्यावधी रुपये भाडे प्रलंबित आहे, ते कसे वसूल करणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शहरातील अनेकांकडून कोट्यावधी रुपयांचे भाडे महानगरपालिकेला जमा व्हायचे आहे. मात्र, त्याबाबत अजूनही महानगरपालिकेने कोणतेच पाऊल उचलले नाही. हे भाडे वसूल करण्यासाठी महापालिका कोणती कारवाई करणार, असा प्रश्न आता बेळगावच्या जनतेतून उपस्थित होत आहे.









