कडोली परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती : पाणीपुरवठ्यात 50 टक्क्यानी घट : कूपनलिका-विहिरीतील पाण्याच्या पातळीने गाठला तळ
वार्ताहर /कडोली
वळीव नाही, मान्सूनपूर्व नाही आणि मान्सूनही हजेरी लावण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाणीटंचाईबरोबर शेती व्यवसायाचे गणितच कोलमडणार की काय? अशी भीती कडोली परिसरात व्यक्त होत आहे. पिण्याच्या पाणीपुरवठ्यात 50 टक्क्यानी घट झाली आहे. तर मुसळधार पाऊस पडल्याशिवाय शेतीकामांना जोर येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. केदनूर-मण्णीकेरी ते कंग्राळी खुर्द असा दक्षिण-उत्तर पट्टा आणि अगसगा ते काकतीपर्यंतच्या अशी कडोली परिसरात या उन्हाळी हंगामात एकही मुसळधार वळीव पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे एकंदरीत परिस्थिती बिकट झाली आहे. कूपनलिका आणि विहिरीतील पाण्याच्या पातळीने तळ गाठला आहे. शेती व्यवसायात तर पाण्याची टंचाई जाणवत आहे. शिवाय गावपातळीवरील पाणीटंचाई तीव्र बनत चालली आहे. दरवर्षी वळीव पावसाची हजेरी होत होती. त्यामुळे एवढ्या मोठ्याप्रमाणात पाणीटंचाई जाणवत नव्हती. यावेळी एकही वळीव नाही. मान्सूनपूर्व नाही आणि आता मान्सूनही बरसण्याच्या मन:स्थितीत नाही. त्यामुळे यापुढे अशीच परिस्थिती राहिल्यास काय करावे, अशी चर्चा शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांत होत आहे. आताच्या घडीला पिण्याच्या पाणीटंचाईने गावातील नळांना पाण्याच्या पुरवठ्यात 50 टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येत आहे. आताच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यापुढे मुसळधार पावसाने हजेरी लावली नाही तर पाणीपुरवठ्यात आणखी कपात होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे शेती व्यवसायाचे पूर्ण गणितच बिघडणार की काय? अशी बोलले जात आहे.
कडोली परिसरातील शेती मशागतही अद्याप नाही
पावसाअभावी कडोली परिसरातील शेती मशागतही अद्याप झाली नाही. माळरानातील शेतजमिनीत पूर्ण ओलावा झाल्याशिवाय मशागत करता येत नाही. मुसळधार पाऊस सध्यातरी पडणार की नाही, अशी संभ्रमावस्था निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. पिके घेण्याचा कालावधी पुढे ढकलत चालला आहे. पिकांना उशिरा लागवड केल्यास पुढील परिस्थिती अनुकूल राहिल की नाही, पिकांचे उत्पादन निघेल की नाही, असे अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. आता लवकरात लवकर मुसळधार पावसाची आवश्यकता असून कडोली परिसरातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.









