शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम : काही ठिकाणी रस्त्यावरच अतिक्रमण : नगरपंचायतीने लक्ष घालण्याची आवश्यकता
खानापूर : खानापूर नगरपंचायतीच्या अडीच वर्षानंतर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षाची निवड झाली असून, प्रशासकीय कारभार संपुष्टात आला आहे. आता नगरसेवकांच्या हाती शहराचा कारभार आला आहे. प्रशासकीय कारभाराच्या वेळी शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमणे करून विनापरवाना बांधकामे करण्यात आली आहेत. तसेच काही बांधकामे सुरू आहेत. तर काही बांधकामे चक्क रस्त्यावर आली आहेत. याबाबत आता नगरसेवक आपली भूमिका चोखपणे बजावतील का, तसेच प्रशासकीय कारभाराच्यावेळी चाललेल्या अनागोंदी कारभाराला लगाम घालणार का, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. शहरात इमारत तसेच व्यावसायिक इमारतींचे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. रहदारीचा विचार करून गटारीपासून 7 फूट अंतर सोडून बांधकाम करणे अनिवार्य आहे. सध्या शहरात तसे कोणतेच बांधकाम होताना दिसत नाही.
काही बांधकामे गटारीला लागूनच तर काही गटारीच्या बाहेर चक्क रस्त्यावर अतिक्रमण करून सुरू आहेत. मठ गल्ली येथील अत्यंत अरुंद रस्त्याच्या बाजूला कवळे मठाचे बांधकाम केले आहे. या बांधकामाचा जीणा आणि पायऱ्या पूर्णपणे रस्त्यावर आल्या आहेत. खिडक्यांचे सज्जे पूर्णपणे रस्त्यावर आहेत. नव्याने बांधण्यात येत असलेल्या संरक्षण भिंतीचे गटारीच्या बाहेर बांधकाम सुरू केले होते. या बांधकामाविरोधात नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यानी आक्षेप घेऊन बांधकाम थांबविल्यावावर नगरपंचायतीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यावरच पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संपूर्ण मठाचे बांधकाम विनापरवाना झाले असून याबाबत नगरपंचायतीकडून कोणताही अधिकृत बांधकाम परवाना देण्यात आलेला नाही. तसेच मठाधीशांकडून एकाने वटमुख्त्यार पत्र घेऊन मठाच्या बांधकामाचा कोणताही बांधकाम परवाना न घेता. संपूर्ण मठाचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे अगोदरच अरुंद असलेला रस्ता पुन्हा कमी झाला आहे.
नियम धाब्यावर बसून बांधकाम
याच मठाच्या समोर एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. त्या इमारतीबाबत नगरपंचायतीने काटेकोर नियम लावून बांधकाम थांबविण्यात आले होते. संबंधित मालकाने नगरपंचायतीच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेऊन बांधकाम पूर्ण केले आहे. तसेच बाजारपेठेतही अगदी अरुंद रस्त्याच्या ठिकाणी चार मजली व्यावसायिक बिल्डिंग रस्त्यावरच अतिक्रमण करून बांधण्यात येत आहे. तसेच शहरातील अनेक भागातील बांधकामे नियम धाब्यावर बसून बांधकाम करण्यात येत आहेत. मात्र याकडे नगरपंचायतीच्या बांधकाम विभाग आणि मुख्याधिकाऱ्यांनी कानाडोळा केला आहे. नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी शहरातील बांधकामाबाबत सर्वाना समान न्याय लावणे गरजेचे आहे. आता नव्याने नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षाची निवड करण्यात आली असून, आता नगरपंचायतीचा कारभार नगरसेवकांकडे आलेला आहे. आता तरी हे नगरसेवक सामाजिक बांधिलकी ठेवून शहरातील बांधकामाबाबत आणि नगरपंचायतीच्या कारभाराबाबत योग्य निर्णय घेतील का, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.
सामान्य जनतेला मात्र काटोकोर नियम
नगरपंचायतीत कुणाचा पायपोस कुणाच्या पायी असे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नगरपंचायतीचा कारभार रामभरोसे सुरू आहे. सामान्य जनतेला मात्र काटोकोर नियम लावण्यात येत आहेत. दांडगाई करणाऱ्यांना मात्र पंचायतीकडून अभय मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या सर्व इमारतीना विद्युतपुरवठाही दिलेला आहे. त्यामुळे शासकीय जागेवरच मालकी हक्क सांगून जागा लाटण्याचेही प्रकार शहरात घडत आहेत. काही महिन्यापूर्वी नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी जांबोटी रस्त्यावरील गरीब आणि हातावर पोट भरून खाणाऱ्यांची खोकी हटवली होती. यावेळी या सामान्य आणि गरीब खोकीधारकाना वालीच नसल्यामुळे सर्व खोकीधारक रस्त्यावर आले आहेत. आज याच ठिकाणी चारचाकी लावून दुकाने थाटण्यात आली आहेत. याकडे मात्र नगरपंचायतीने साफ दुर्लक्ष केले आहे. या चारचाकी दुकानामुळे जांबोटी रस्त्यावर वाहुतकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे.
न. पं. अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार
दोन दिवसापूर्वी एका टिप्परने रिक्षाला धडक दिल्याने अपघात झाला होता. याकडे मात्र नगरपंचायतीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यावर कुणाचाच वचक आणि दबाव नसल्याने अधिकारीही मनमानी कारभार करत आहेत. आता नगरसेवकांच्या हाती कारभार आला आहे. त्यामुळे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक आपली जबाबदारी पार पाडतील का, हाच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांतून विचारला जात आहे.









