हिंडलगा गावच्या प्रवेशद्वारावरील दुभाजकाला दररोज वाहनांची धडक, त्वरित उपाययोजनांची गरज
बेळगाव : सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले आहे. याअंतर्गत बॉक्साईट रोडवरील पुलाचे रुंदीकरण हाती घेतले आहे. मात्र, सध्या ही ठिकाणे अपघातांचा सापळा बनला असून याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष झाले आहे. अर्धवट कामामुळे दररोज अपघात घडत असून मोठा अनर्थ घडल्यानंतरच अधिकाऱ्यांचे डोळे उघडणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. बेळगाव-वेंगुर्ला रोडचे हिंडलगा ग्राम पंचायत हद्दीत श्रीनाथ नगरपासून विठ्ठल रखुमाई मंदिरपर्यंत रुंदीकरण करण्यात आले. दुतर्फा गटारीचे बांधकाम करून मध्यभागी दुभाजक घालण्यात आले. पण गावच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर रस्ते अरुंद असल्याने अपघात घडत आहेत. श्रीनाथनगर आणि विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ दुभाजकांना ठोकरून अपघात झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या ठिकाणी अरुंद रस्त्यामुळे हे अपघात घडत आहेत. रस्त्याची रुंदी जास्त असूनही या ठिकाणी अपघात घडत आहेत. बॉक्साईट रोडवर नाल्यावरील पुलाची रुंदी वाढविण्यात आली आहे. पण हे काम अर्धवट असून पूर्ण करण्याकडे कंत्राटदाराने कानाडोळा केला आहे. पुलाचे काम पूर्ण करून अपघात टाळावेत, अशी मागणी सातत्याने करण्यात आली होती. पण सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी कोणतीच दखल घेतली नाही. परिणामी अर्धवट पुलाच्या ख•dयात वाहनांचे अपघात घडत आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूला मातीचा भराव घालून रस्ता व्यवस्थित करण्याची गरज आहे. पण कंत्राटदाराने काम अर्धवट केले आहे. कुवेंपू नगरजवळ रस्ता अरुंद असल्याने दुभाजकाला वाहने धडकण्याचे प्रकार वाढले आहेत. या ठिकाणीही रिफ्लेक्टर किंवा कोणतीच सुविधा करण्यात आली नाही. प्रवेशद्वारावर ख•s निर्माण झाल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने विविध विकासकामे हाती घेतली आहेत. पण अर्धवट कामांमुळे व गैरसोयीमुळे वाहनांचे नुकसान होत आहे. या ठिकाणी मोठा अनर्थ घडल्यानंतरच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना जाग येणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी अपघातस्थळाची पाहणी करून आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.
पथदीप बसविणे आवश्यक
रुंदीकरण केलेल्या रस्त्याप्रमाणेच दोन्ही बाजूच्या प्रवेशद्वारांवर रस्ता रुंद केल्यास अपघात टळण्याची शक्यता आहे. पण सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे दुभाजकांना ठोकरून अपघात घडत आहेत. रात्रीच्या वेळी दुभाजक असल्याचे निदर्शनास येत नाही. या ठिकाणी रिफ्लेक्टर किंवा पथदीप बसविणे आवश्यक आहे. याकडे सार्व. बांधकाम खात्याने दुर्लक्ष केले आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.









