सांगली :
“सरकारने लागू केलेला गोवंश हत्या बंदी कायदा, प्रत्यक्षात गोपालक हत्या बंदी कायदाच ठरतो आहे,” अशी टीका करत रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आणि माजी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. “या कायद्याच्या नावाखाली काही स्वयंघोषित गोरक्षकांनी शेतकऱ्यांना त्रास देण्याचा धंदा सुरू केला आहे. हे खंडणीखोर जर थांबले नाहीत, तर आम्ही नांगराचा फाळ हाती घेऊन त्यांचा बंदोबस्त करू,” असा सज्जड इशारा त्यांनी दिला आहे.
माध्यमांशी बोलताना खोत म्हणाले की, “आज शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. भाकड गाई, होस्टाईल झालेल्या गाई, कमी दूध देणाऱ्या जर्सी गाई आणि त्यांना होणारे आजार यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. दोन जनावरे असताना त्यात एक जर निरुपयोगी ठरले, तर त्याला सांभाळणे शेतकऱ्याला परवडत नाही. जर्सी गाईला गोर्या झाला, तरी तो औताला उपयोगी नाही.”
- दुधाच्या व्यवसायातही तोटाच
“शेतकरी कर्ज काढून दुधाचा व्यवसाय करत आहेत, पण त्यात जर एक-दोन अनुत्पादक जनावरे भार म्हणून आली, तर संपूर्ण व्यवसाय तोट्यात जातो. अशावेळी ही जनावरे विकायची म्हटलं की तथाकथित गोरक्षक रस्त्यावर अडवतात आणि खंडणी मागतात. यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांवर अन्याय होतो आहे.”
- पूर्वी काय होतं, आणि आता?
“पूर्वी शेतकरी भाकड जनावरे विकून त्यातून मिळालेल्या २०–२५ हजार रुपयांत नवीन जनावर खरेदी करू शकत होता. पण आता गोरक्षकांच्या या गोरखधंद्यामुळे संपूर्ण राज्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. हे गोरक्षक नव्हे, तर गोभक्षक आहेत,” असा घणाघात खोत यांनी केला.
- ‘लढा अटळ आहे’ – खोतांचा निर्धार
“ही लढाई केवळ शेतकऱ्याच्या हक्कांची नाही, तर त्याच्या अस्तित्वाची आणि घामाची आहे. आता आम्ही नांगराचा फाळ हाती घेऊन या गोरखधंदा करणाऱ्या गोभक्षकांचा बंदोबस्त करू. आता मागे हटायचं नाही,” असा ठाम इशाराही खोत यांनी दिला आहे.








