युवा समितीच्या बैठकीत निर्धार
बेळगाव : भाषावार प्रांतरचनेनंतर सीमाभागाला अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आले. याचा निषेध नोंदवून 1956 पासून 1 नोव्हेंबर हा काळादिन म्हणून पाळला जातो. यावर्षीही काळादिनाची मूक सायकल फेरी कोणत्याही परिस्थितीत काढणारच असा निर्धार महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या बैठकीत करण्यात आला. मंगळवारी कावळे संकुल येथे म. ए. युवा समितीची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर होते. सायकल फेरीमध्ये मोठ्या संख्येने युवकांनी सहभागी व्हावे व मराठी भाषिकांची एकजूट दाखवून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. मराठी भाषिकांना डिवचणाऱ्या आणि सीमाप्रश्नावर तोंडसुख घेणाऱ्या खासदार जगदीश शेट्टर व कन्नड संघटनांच्या म्होरक्यांचा निषेधाचा ठराव मांडण्यात आला.
उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या काळ्यादिना संदर्भातील याचिकेचा निकाल मराठी भाषिकांच्या बाजूने लागला. त्यासाठी यशस्वी बाजू मांडणाऱ्या अॅड. महेश बिर्जे व त्यांच्या सहकाऱ्यांचा अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखत काळ्यादिनाच्या मूक सायकल फेरीला प्रशासनाने आडकाठी आणू नये व संविधानाने दिलेल्या अधिकारावर गदा आणू नये, असे कार्याध्यक्ष सचिन केळवेकर यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष वासू सामजी, गुंडू कदम, सूरज कुडूचकर, विनायक कावळे, रोहन कुंडेकर, साईराज जाधव, महेश जाधव, आकाश भेकणे, सूरज चव्हाण, विकास भेकणे, प्रवीण धामणेकर, सौरभ तोंडले यासह इतर उपस्थित होते. सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी प्रास्ताविक केले तर चिटणीस प्रतीक पाटील यांनी आभार मानले.









