आढावा बैठकीत धर्मादाय खाते आयुक्तांचे प्रतिपादन
वार्ताहर /बाळेकुंद्री
सौंदत्ती येथील यल्लम्मा देवस्थानच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक पावले उचलली जातील. त्यासाठी कामांचा सविस्तर प्रस्ताव सादर करा. आम्ही मंजुरी देऊ, असे प्रतिपादन धर्मादाय खात्याचे आयुक्त एच. बसवराजेंद्र यांनी केले. ते सोमवारी सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीचे दर्शन घेऊन अधिकाऱ्यांच्या विकास आढावा बैठकीत बोलत होते. सौंदत्ती यल्लम्मा देवस्थान प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. या मंदिराचे कर्मचारी, अधिकारी व व्यवस्थापन समिती सदस्यांनी सदैव भाविकांच्या संपर्कात राहावे, अशी त्यांनी सूचना केली. जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले की, डोंगरावर येणाऱ्या भाविकांच्या स्वच्छतेला अधिक प्राधान्य देण्यात आले असून आणखी स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी असे सांगून 3.99 कोटींच्या खर्चातून भाविकांसाठी 246 वसतिगृहे बांधण्यात आली आहेत. लवकरच ती भाविकांसाठी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. अतिथीगृहाचे शुल्क 950 वरून 750 इतके करावे, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.
सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य म्हणाले, यल्लम्मा डोंगरावरील अंतिम टप्प्यात असलेली कामे लवकर पूर्ण करून भाविकांची सोय करावी. उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व धार्मिक स्थळ म्हणून ख्याती असणाऱ्या यल्लम्मा देवस्थान परिसरातील स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेण्यात यावी, अशी कडक सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. यावेळी बैलहोंगलच्या प्रातांधिकारी प्रभावती जी., देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बसय्या हिरेमठ, सदस्य वाय. वाय. काळप्पनावर, कोळप्पगौड गंदिगौड, सौंदत्तीचे तहसीलदार एम. बी. वाली, देवस्थानचे अधीक्षक अरविंद माळगे उपस्थित होते.









